Nagpur Crime : दुचाकीचा कट लागल्याच्या या वादातून एकाला संपवलं
Nagpur Crime : दुचाकीचा कट लागला या वादावरुन नागपुरात एकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गेल्या आठ दिवसातील नागपुरातील ही तिसरी हत्येची घटना आहे.

Nagpur Crime : दुचाकीचा कट लागला या वादावरुन नागपुरात (Nagpur) एकाची हत्या (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागपूरच्या कळमना पोलीस स्टेशन अंतर्गत विजयनगर परिसरातील रविवारी (8 जानेवारी) रात्री दहा वाजता ही घटना घडली. लक्ष्मीनारायण उर्फ अजय थट्टू चंदानिया (वय 21 वर्षे, रा. कामठी) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. गेल्या आठ दिवसातील नागपुरातील ही तिसरी हत्येची घटना आहे.
काय घटना घडली?
विजयनगर परिसरात लक्ष्मीनारायण आणि त्याचा मित्र दुचाकीने जात होता. त्यावेळी त्यांच्या दुचाकीला आरोपींच्या दुचाकीचा कट लागला. या अपघातात दुचाकीचे नुकसान झाल्याने लक्ष्मीनारायण आणि त्याच्या मित्राने आरोपीकडे नुकसानभरपाईची मागणी केली. परंतु हाच वाद वाढत जाऊन दुसऱ्या दुचाकीवर असलेल्या दोन्ही आरोपींनी लक्ष्मीनारायणची भोसकून हत्या केली. तर त्याच्या मित्रालाही गंभीर जखमी केलं आहे
दुचाकीच्या धडकेत नुकसान, पैसे मागितल्यावरुन वाद
पोलिसांच्या माहितीनुसार, विजय साहू असं आरोपीचं नाव आहे. तो हमाली करतो. शिवाय त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. रविवारी विनय साहूच्या पुतण्याचा वाढदिवस होता. तो आपल्या दुचाकीवरुन वाढदिवसानिमित्त केक आणण्यासाठी जात होता. त्याचवेळी गुलमोहरनगर जवळ त्याच्या दुचाकीची आणि लक्ष्मीनारायणच्या दुचाकीची धडक झाली. यामध्ये लक्ष्मीनारायणच्या दुचाकीचं नुकसान झालं. त्यामुळे त्याने नुकसानभरपाई मागितली.
यावर विनयने सांगितलं की आज माझ्या पुतण्याचा वाढदिवस आहे. त्याच्यासाठी केक आणायला जात आहे. माझ्याकडे केवळ केक आणण्यापुरतेच पैसे आहे. यावरुन त्यांच्यात बाचाबाची झाली. मग वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. या मारामारीत विनय साहूच्या तोंडाला जखम झाली आणि रक्त आलं. यामुळे संतापाच्या भरात आपल्याजवळ असलेल्या चाकून लक्ष्मनारायणवर वार करण्यास सुरुवात केली. तर दुचाकीवरील त्याच्या मित्रावरही विनयने हल्ला केला.
लक्ष्मीनारायणने जागीच प्राण सोडले, आरोपीला बेड्या
या घटनेत लक्ष्मीनारायण गंभीर जखमी झाला आणि त्याने जागीच प्राण सोडले. तर मित्र जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच कळमना पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी लक्ष्मीनारायणचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला तर त्याच्या मित्राला उपचारांसाठी रुग्णालयात हलवलं. तर काही वेळातच आरोपी विनय साहूला बेड्या ठोकल्या. कळमना पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
