(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur Crime : लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर पावणेदोन वर्षे अत्याचार; फसवणूक करणाऱ्या तरुणांची थेट रवानगी तुरुंगात
Nagpur Crime : ओळखीतून झालेली मैत्री आणि त्यानंतर प्रेमाच्या जाळ्यात एका अल्पवयीन तरुणीला ओढत तिच्यावर पावणेदोन वर्षे अत्याचार करणाऱ्या एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.
नागपुर : ओळखीतून झालेली मैत्री आणि त्यानंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढत एका अल्पवयीन मुलीवर पावणेदोन वर्षे अत्याचार करणाऱ्या एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. नागपुरातील (Nagpur Crime) अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. 19 वर्षीय आर्यन दिनेश भगत असे आरोपीचे नाव असून तो गणेशपेठ येथील रहिवासी आहे. हा प्रकार ज्यावेळी सुरू झाला तेव्हा तो देखील अल्पवयीनच होता. तर अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी मुलगी ही केवळ साडे चौदा वर्षांची होती. प्रमाच्या जाळ्यात ओढत तरुणाने पीडित मुलीवर वारंवार अत्याचार केला. मात्र ज्यावेळी लग्नाची विचारणा केली असता त्याने या प्रकरणातून आपला पळ काढला. त्यानंतर प्रेमात आपली फसवणूक झाली असल्याचे कळताच पीडित मुलीने पोलीस ठाणे गाठत तक्रार दखल केली. या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.
अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याच्यार
आरोपी आर्यन आणि पीडित मुलीची व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ओळख झाली. कालांतराने दोघांमध्ये मैत्री आणि त्यानंतर आर्यनने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यासाठी पीडित मुलीला लग्नाचे देखील वचन दिले. नात्यात विश्वास निर्माण झाल्याचे बघता आर्यनने अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका लॉजमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याने वारंवार असे प्रकार केले. ज्यामध्ये अगदी नातेवाइकाच्या घरी नेऊन देखील त्याने अत्याचार केला. 11 मार्च 2022 ते 4 डिसेंबर 2023 या कालावधीत त्याने अनेकदा तिच्यावर अत्याचार केला. मात्र, लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने नकार दिला. पीडित मुलीला आपली फसवणूक झाली असल्याची बाब लक्षात आली. त्यानंतर आपल्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार आपल्या आईला सांगितला. पीडित मुलीच्या आईने तिला घेऊन थेट अंबाझरी पोलीस ठाणे गाठले आणि आर्यन विरोधात तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली.
वाठोडा ठाण्यांतर्गत देखील अशीच एक घटना उघड
असाच एक प्रकार नागपूरच्या वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. खरबी येथील रहिवासी असलेल्या 25 वर्षीय जुबेर रफीक शेख या आरोपीने ओळखीतून झालेल्या प्रेमाचा गैरफायदा घेत 20 वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार केला. मात्र ज्यावेळी तिने लग्नासाठी विचारणा केली असता त्याने नकार दिला. आरोपीची 20 वर्षीय तरुणीशी ओळख होती. त्याने तिला अगोदर मैत्रीसाठी विचारणा केली आणि त्यानंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यासाठी तरुणीला अनेक खोटे आश्वासन देत लग्नाचे देखील स्वप्न दाखविले.
दरम्यान, मे महिन्यात तो तिला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. तेथे तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याने वारंवार तिच्यावर हॉटेल किंवा स्वतःच्या घरी अत्याचार केले. तरुणी त्याला जेव्हाही लग्नाबाबत विचारणा करायची त्यावेळी तो उडवा-उडवीचे उत्तर देत टाळाटाळ करायचा. दरम्यान या मुद्द्याला घेऊन दोघांमध्ये मतभेद देखील होते. डिसेंबर महिन्यात तरुणीने आरोपीला परत विचारले असता त्याने लग्न करण्यास नकार दिला. यामुळे तरुणीला मोठा धक्का बसला आणि ती नैराश्यात गेली. अखेर तिने हिंमत दाखवली आणि घडलेला प्रकाराबद्दल पोलिसांना माहिती देत तक्रार दिली. या प्रकरणी वाठोडा ठाणे पोलिसांनी जुबेरविरोधात तक्रार नोंदवून त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवत त्याला अटक केली.