Nagpur Crime : वेगानं दुचाकी चालवण्याच्या वादातून तरुणाची हत्या; तीन आरोपींना अटक, एक फरार
Nagpur Crime : नागपुरात वेगानं दुचाकी चालवण्याच्या वादातून तरुणाची हत्या करण्यात आली आहे. चार आरोपींनी संगनमत करून शाहरुखचा खून केल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं आहे. पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे.
नागपूर : वेगानं दुचाकी चालवल्यामुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. वेगनं दुचाकी चालवत असल्याच्या कारणावरुन या तरुणाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील गणेश नगर परिसरात काल रात्री एका तरुणाची निर्घुण हत्या करण्यात आली होती. परंतु, ही हत्या नेमकी का आणि कशासाठी करण्यात आली, हे मात्र समजू शकलेलं नव्हतं. त्यानंतर पोलीस तपासात एक धक्कादायक खुलासा झाला आहे. या तरुणाच्या हत्येसाठी वेगाने दुचाकी चालविल्यामुळे झालेला वाद कारणीभूत असल्याचं समोर आलं आहे. सैफ अली उर्फ शाहरुख शोकत अली असं मृत तरुणाचे नाव आहे. चार आरोपींनी संगनमत करून शाहरुखचा खून केल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं आहे. पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणाला वेगानं दुचाकी चालवण्याची सवय होती. त्यामुळे गणेशनगर परिसरातील काही मंडळी त्याच्यावर नाराज होती. घटनेच्या वेळी गणेश नगर परिसरात काही युवक वेगाने गाडी चालवत असल्याचे लक्षात येताच बब्ब्या, विनायक आर. के. पटेल, बंटी जैस यासह अन्य एक आरोपी वेगानं दुचाकी चालवणाऱ्या चालकांना शोधत होते. त्याच दरम्यान मृत तरुण शाहरूख देखील त्या ठिकाणी दुचाकीवर आला. आरोपी आणि शाहरुख यांच्यात वादविवाद सुरु झाल्यानंतर आरोपींनी त्यांच्या जवळ असलेल्या धारधार शस्त्रांनी शाहरुखवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. यामध्ये शाहरुख गंभीर जखमी झाला असून घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला.
सदर घटनेची माहीती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या माहिती वरून पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे तर एक आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे. तसेच याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :