Nagpur Crime : नागपूरच्या डॉक्टरला हॉटेलमध्ये डांबून उकळली लाखोंची खंडणी; संशयिताचा शोध सुरू
Nagpur Crime News : नागपूरमधील रहिवासी असलेल्या एका तरुणाने ओळखीतील डॉक्टरकडून व्यवसायात गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने चक्क 28 लाख 83 हजार रुपये उकळल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.
Nagpur News नागपूर : नागपूरमधील (Nagpur News) रहिवासी असलेल्या एका तरुणाने ओळखीतील डॉक्टरकडून व्यवसायात गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने चक्क 30 लाख रुपये उकळल्याचे प्रकरण (Extortion) उघडकीस आले आहे. डॉक्टर हिमांशू राऊत (34) यांच्या सोबत हा धक्कादायक प्रकार घडला असून राकेश पांडुरंग पुसदकर (35) याने हे कृत्य केले आहे. अधिक धक्कादायक बाब म्हणजे पैशांची वसूली केल्यानंतर या संशयित आरोपी राकेशने डॉ. हिमांशू यांना नेरुळमधील एका हॉटेलमध्ये डांबून ठेवले. सोबतच त्यांना ठार मारण्याची धमकी देऊन त्याच्या वडिलांकडून आणखी 30 लाख रुपयांची खंडणी उकळली आहे. या प्रकरणी नेरुळ पोलिसांनी (Police) संशयित आरोपी राकेश पुसदकर याच्या विरोधात खंडणीसह जबरी लुट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला केला असून त्याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.
हॉटेलमध्ये डांबून उकळली 30 लाखांची खंडणी
या प्रकरणातील संशयित आरोपी राकेश हा नागपूरचा राहणारा आहे. 2020 मध्ये तो आपल्या आईला डॉ. राऊत यांच्या क्लिनीकमध्ये घेऊन गेला होता. त्यानंतर डॉ. राऊत यांची राकेशसोबत ओळख झाली. दरम्यान या दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. याचाच गैरफायदा घेऊन मार्च 2023 मध्ये राकेशने त्याच्या व्यवसायात गुंतवणुकीसाठी काही पैशांची मागणी केली. त्यानंतर डॉ. राऊत यांनी राकेशवर विश्वास ठेवून त्याला 28 लाख 83 हजार रुपये दिले. राकेशने जून 2023 मध्ये डॉ. राऊत यांना सीबीडी, बेलापूर येथे बोलावून घेतले. त्यानंतर नेरुळमधील व्हिला रेसिडेन्सी हॉटेलमध्ये थांबायला सांगितले. दरम्यान त्यांच्यात भेट झाली आणि राकेशने हॉटेलच्या बाहेरून आणलेले जेवण डॉ. राऊत यांनी घेतले. मात्र या जेवणात गुंगीचे औषध टाकण्यात आल्याने डॉ. राऊत यांना गुंगी आली. हे पाहताच राकेशने डॉ. राऊत यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांना धमकावत मला आणखी 50 लाख रुपये देण्यास बजावले. पैसे न दिल्यास मारून टाकण्याची देखील धमकी दिली.
अश्लील फोटो आणि व्हिडीओचा धाक दाखवत खंडणीची मागणी
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता घाबरलेल्या डॉ. राऊत यांनी तत्काळ त्यांच्या वडिलांना फोन करण्यास सांगितले. त्यानंतर राकेशने त्याच्या वडिलांकडून आणखी 30 लाख रुपये उकळले. पैसे मिळताच राकेशने घटनास्थळावरून पलायन केले. मात्र दोन दिवसानंतर शुद्धीवर आलेल्या डॉ. राऊत यांनी रेल्वेने नागपूर येथील घर गाठले आणि घडल्या प्रकाराची माहिती कुटुंबियांना दिली. त्यानंतरही राकेशने डॉ. राऊत यांच्या वडिलांना फोन करून डॉ. राऊत यांचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ त्याच्याकडे असल्याचे सांगून त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली. अखेर संशयित आरोपी राकेशच्या त्रासाला कंटाळून डॉ. राऊत यांनी बुधवारी नेरुळ पोलीस ठाण्यात येऊन रितसर तक्रार दाखल केली. सध्या पोलीस संशयित आरोपी राकेशचा शोध घेत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या