Lal Krishna Advani : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर असल्याची माहिती
Lal Krishna Advani : लालकृष्ण अडवाणी 97 वर्षांचे आहेत. गेल्या 4-5 महिन्यांत त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करावे लागले. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. या कारणास्तव त्यांना आज (14 डिसेंबर) दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. वैद्यकीय बुलेटिन लवकरच जारी केले जाऊ शकते.
लालकृष्ण अडवाणी 97 वर्षांचे आहेत. गेल्या 4-5 महिन्यांत त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करावे लागले. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लालकृष्ण अडवाणी हे गेल्या काही काळापासून आरोग्याशी संबंधित समस्यांशी झुंजत होते. त्याच वर्षी त्यांना देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्नही देण्यात आला. आरोग्याच्या समस्यांमुळे ते राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांना त्यांच्या निवासस्थानीच भारतरत्न प्रदान करण्यात आला. 8 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. पीएम मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक फोटो देखील शेअर केला होता, ज्यामध्ये पीएम मोदी लालकृष्ण अडवाणींना पुष्पगुच्छ देताना दिसत होते. पीएम मोदींनी फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते, "आडवाणीजींच्या निवासस्थानी भेट दिली आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या."
अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते गृहमंत्री आणि उपपंतप्रधानही होते
लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म ८ नोव्हेंबर 1927 रोजी कराची येथे झाला. 1942 मध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दाखल झाले. 1986 ते 1990, पुन्हा 1993 ते 1998 आणि 2004 ते 2005 या काळात ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. याशिवाय ते सर्वाधिक काळ पक्षाचे अध्यक्ष राहिले आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते गृहमंत्री आणि उपपंतप्रधानही होते.
इतर महत्वाच्या बातम्या