थरकाप! तरुणांचा दिवसाढवळ्या वकिलावर चाकूहल्ला, हाणामारी, तुफान राडा CCTV कॅमेऱ्यात कैद
Dharashiv Crime: पोलिसांकडून मुलांमधील भांडणानंतर हा हल्ला झाल्याचं सांगितलं जातंय. मात्र अल्पवयीन मुलांकडे चाकू असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
Dharashiv Crime: राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. बीडमध्ये सरपंचाची अपहरणातून हत्या, अत्याचाराच्या घटना, चोऱ्या, खंडणी वसूली अशा घटनाही वाढल्या असून आता धाराशिव शहरात दिवसाढवळ्या चाकू आणि कोयत्याने हल्ल्याचा थरार घडलाय. शाळकरी मुलांकडून वकिलावर चाकू हल्ला करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शहराच्या गजबजलेल्या भागात तुंबळ हाणामारी करत तुफान राडा झाल्याची घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. या घटनेनंतर सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मुलांमध्ये अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
धाराशिव शहरातील हा चाकू हल्ला शुक्रवारी अडीच ते तीनच्या दरम्यान झाला . याच भागात शहरातील नामांकित भोसले हायस्कूल, आरपी कॉलेज आहेत. चार वाजता शाळा सुटल्यानंतर अनेक शालेय विद्यार्थी, मुली या रस्त्याने पायी घराकडे परततात. पोलिसांकडून मुलांमधील भांडणानंतर हा हल्ला झाल्याचं सांगितलं जातंय. मात्र अल्पवयीन मुलांकडे चाकू असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
नक्की झाले काय?
धाराशिव शहरातील गजबजलेल्या भागात शुक्रवारी अडीच ते तीन वाजता चाकू आणि कोयत्याने झालेल्या हल्ल्याने थरकाप माजवला. शाळकरी मुलांच्या भांडणानंतर एका मुलाच्या वडीलावर चाकू हल्ला झाला.ॲड. राजू आडे हे हल्ला झालेल्या वकिलाचे नाव आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा हल्ला कैद झाला आहे. यामध्ये सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हल्ला करणाऱ्यांमध्ये काही अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. शाळा सुटल्यावर वॉर्डातील मुलांची आणि शालेय विद्यार्थ्यांची गर्दी असलेल्या परिसरात तुफान राडा झाला. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मुलाच्या वडिलांवर चाकू हल्ला झाला. यामुळे मुलांमधील हिंसा आणि चाकूंच्या वापराच्या वाढत्या प्रमाणामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांकडून हल्ला करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू आहे. या घटनेने अल्पवयीन मुलांमधील हिंसा आणि शस्त्रांचा वापर चिंता निर्माण झाली आहे. घटनास्थळी पोलीस तातडीने दाखल झाले होते. घटनेचा तपास सुरु आहे.
घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
शहराच्या नामांकीत शाळा आणि महाविद्यालय असणाऱ्या गजबजलेल्या चौकात दिवसाढवळ्या झालेल्या या हल्ल्याची दृश्ये CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून तरुणांचा भरचाैकात तुफान राडा झाला. यात भांडण सोडवायला मध्ये पडलेल्या एका मुलाच्या वडिलांवर चाकूहल्ला झाल्याचे दिसत आहे. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण आहे.