नातेवाईकांनी दोघांना अग्नी दिला, दुसऱ्या दिवशी अस्थींची चोरी, नागपुरात खळबळ, नेमका प्रकार काय?
प्राथमिक तपासात कोणीतरी तंत्रविद्या किंवा काळ्या जादूसाठी या अस्थींची चोरी केली असावी, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

Nagpur: नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील भिवापूर रोडवरील स्मशानभूमीतून दोन प्रेतांच्या अस्थी चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नातेवाईक आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी जळगावमधूनही असाच प्रकार समोर आला होता. तंत्रविद्यासाठी कोणीतरी या अस्थींची चोरी केली असावी असा नातेवाईकांना संशय आहे. (Nagpur Crime)
नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी उमरेड येथील 23 वर्षीय साक्षी पाटील आणि 47 वर्षीय नरेश सेलोटे या दोघांच्या प्रेतांना त्यांच्या नातेवाईकांनी अंतिम संस्कारासाठी अग्नी दिला होता. परंपरेनुसार दुसऱ्या दिवशी सकाळी नातेवाईक अस्थी संकलनासाठी स्मशानभूमीत गेले असता त्यांनी चिता ठिकाणाजवळ अस्थी गायब असल्याचे पाहून धक्का बसला. त्यांनी तत्काळ याची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. प्राथमिक तपासात कोणीतरी तंत्रविद्या किंवा काळ्या जादूसाठी या अस्थींची चोरी केली असावी, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. स्थानिक रहिवाशांनाही यापूर्वी अशा अफवा ऐकिवात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा प्रकार अंधश्रद्धा व जादूटोणा यांच्याशी संबंधित असल्याची शक्यता पोलिस नाकारत नाहीत.
या घटनेनंतर उमरेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि अज्ञात आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जादूटोणा, अंधश्रद्धा प्रतिबंध आणि काळी जादू कायदाद्या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. आरोपीचा शोध सुरू असून, स्मशानभूमी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच जवळपासच्या हालचालींचा तपास सुरू आहे.दरम्यान, स्थानिक नागरिकांनी अशा अंधश्रद्धेच्या प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
नागपुरातील पोस्ट ऑफिसच्या महिला पोस्टमास्टरचा कोट्यवधी रुपयांवर डल्ला
नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील दिग्रस ब्रांच पोस्ट ऑफिसमध्ये तब्बल सव्वा कोटी रुपयांचा घोटाळा (Post Office Scam) झाल्याचे आरोप होत आहे. या ब्रांच पोस्ट ऑफिसशी जोडलेल्या दिग्रससह वंडली, येरळा धोटे, हरमखोरी या गावातील शेकडो कुटुंबांचे बचत खात्यासह आरडी आणि एफडी खाते दिग्रस येथील ब्रांच पोस्ट ऑफिस मध्ये होते. मोलमजुरी करून मेहनतीने कमावलेल्या छोट्या छोट्या रकमा गावकरी पोस्ट खात्यात मोठ्या विश्वासाने जमा करत होते. मात्र 2022 पासून या ब्रांच पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टमास्टर म्हणून कार्यरत असलेल्या सिंधुबाई बाळबुधे या महिला अधिकाऱ्याने सव्वा कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप होत आहे.
























