मुंबई पोलिसांनी आवळल्या ड्रग्ज सप्लायर्सच्या मुसक्या, नव्या-नव्या कोड वर्ड्सचा केला खुलासा
नव्या वर्षाच्या स्वागताच्या पार्टीमध्ये ड्रग्जचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येईल या शक्यतेनं मुंबई पोलीस ड्रग्ज तस्करांच्या सोशल मीडियातील हालचालींवर नजर ठेवून आहेत.
मुंबई: नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईत होणाऱ्या वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये ड्रग्जचा वापर होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी ड्रग्ज पेडलर्सच्या मुसक्या आवळल्या आहेत. या आधी केवळ गुप्तहेरांच्या मार्फत हे काम करणारे पोलीस आता ड्रग्ज तस्करांवर अंकुश ठेवण्यासाठी सोशल मीडियावरही नजर ठेऊन आहेत.
मुंबईचे पोलीस सह-आयुक्त मिलिंद भारंबे यानी याबाबत माहिती देताना सांगितलं की गेल्या तीन महिन्यात क्राइम ब्रँचने जवळपास 10 कोटी रुपयांचं ड्रग्ज पकडलं आहे. त्यामध्ये हिरोइन, MDMA,चरस, अॅम्फेटामाइन, एलएसडी अशा अनेक प्रकारांचा समावेश आहे.
पोलिसांनी सांगितलं की ड्रग्ज तस्कर पूर्वीसारखं फोनचा वापर करत नाहीत. पोलिसांपासून वाचण्यासाठी आता ते सोशल मीडियाचा वापर करतात, तसेच नवनव्या अॅपच्या माध्यमातून ते आपला व्यवहार करतात.
लॉकडाऊनच्या काळात मुंबईतून बाहेर जाण्यासाठी आणि आत प्रवेश करण्यासाठी केवळ अत्यावश्यक सेवांच्या गाड्यांनाच परवानगी होती. या काळात ड्रग्ज तस्करांनी डग्ज मुंबईत आणण्यासाठी ह्युमन चेनचा वापर केल्याचं समोर आल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. पोलिसांना शंका येऊ नये म्हणून केवळ एकाच व्यक्तीच्या माध्यमातून डग्ज मुंबईत येत नव्हते तर त्यासाठी वेगवेगळ्या 5 ते 7 लोकांचा या ह्युमन चेनमध्ये समावेश असायचा आणि ते गाड्याही बदलायचे.
काय आहेत ड्रग्जचे कोडवर्ड? बदलत्या काळानुसार ड्रग्ज तस्करांनी आपल्या कोडवर्डमध्येही बदल केल्याचं पोलिसांच्या तपासातून पुढं आलंय. या कोडवर्डचा वापर सोशल मीडियामध्ये केला जातोय.
- एक मीटर कापड म्हणजे एक किलो MDMA
- दोन मीटर कापड म्हणजे दोन किलो MDMA
- छोटे ग्राहक MDMA ला हॅपी पिल्सच्या नावाने ओळखतात.
- एक पॉट म्हणजे एक किलो गांजा
- एक चिबा म्हणजे एक किलो चरस
- चरसला क्रिम असंही म्हटलं जातंय
- स्मॅक म्हणजे हिरोइन
- हिराइनला जादू ची पुडी असं देखील म्हटलं जातं.
- आइस म्हणजे अॅम्फेटामाइन
संबंधित बातम्या: