Fraud News: बोगस पतपेढी तयार करून करोडोंची फसवणूक; चार हजार जणांची केली फसवणूक, पतपेढी चालकाला अटक
Fraud News: बोगस पतपेढीच्या माध्यमातून चार हजार फेरीवाले, छोट्या व्यावसायिकांची फसवणूक करणाऱ्याला मालाड पोलिसांनी अटक केली.
Fraud News: बोगस सहकारी पतपेढी काढून छोटे छोटे व्यावसायिक आणि फेरीवाल्यांना गुंतवणुकीतून 6 वर्षात दाम दुप्पट रक्कम परत देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या बोगस पतपेढी संस्था चालकास (Bogus Credit Bank) अटक करण्यात आली आहे. साधारणपणे चार हजाराहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली असल्याचा संशय पोलिसांना आहे. रामसिंग चौधरी (39) असे अटक करण्यात आलेल्या पतसंस्था संचालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साईलीला या मोर्चा पतसंस्थेचे शिक्के व लेटरहेड वापरून आरोपी रामसिंग चौधरी यांनी 'प्रतिज्ञा' ही बोगस पतसंस्था तयार केली होती. ही पतसंस्था रस्त्यावरील फेरीवाले आणि छोट्या छोट्या व्यावसायिकांना गुंतवणूक करून सहा वर्षात दाम दुप्पट रक्कम करून देण्याचे आश्वासन देत असे. त्याशिवाय 'लाडली योजना' आणि इतर योजनांच्या माध्यमातूनही मुलींच्या वडिलांना अडीचपट लाभ व प्रचंड नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. मात्र, मुदत संपून गेल्यानंतरही रामसिंग चौधरी यांनी गुंतवणूकदारांना आपले पैसे परत दिले नाहीत.
यासंदर्भात मालाड पोलीस ठाण्यामध्ये (Malad Police Station) पाच जणांनी तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर मालाड पोलिसांनी भादंवि कलम 406,420, 34 आणि एमपीआयडी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे.
मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र अडाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी एपीआय दिग्विजय पाटील, हवालदार मुजावर शेख यांनी तपास केला. आरोपी रामसिंग चौधरी याने लॉकडाऊनच्या काळात गरीब जनतेने जमा केलेली रक्कम बँकेत जमा केल्याचे उघड झाले. त्याचा कर्ज म्हणून वापर करून तो अधिक नफा आणि व्याज कमवत होता, परंतु मुदत पूर्ण होऊनही ज्यांचे पैसे क्रेडिट सोसायटीमध्ये जमा होते त्यांना तो पैसे परत करत नव्हता. एवढेच नव्हे तर आपल्या तारणाचे नुकसान केल्याने सहकारी पतसंस्था बंद झाल्याचे आरोपीने लोकांना सांगितले.
मात्र, त्याच वेळी आरोपी रामसिंग हा गोरेगाव येथेच 'साबेरा' ही दुसरी पतसंस्था उघडून फसवणुकीचा धंदा चालवत होता. मालाड पोलिसांनी तपास करत आरोपीपर्यंत पोहोचून त्याला अटक केली. तपासात आरोपी रामसिंग आणि त्याच्या अन्य आठ साथीदारांनी मिळून अशा बोगस पतसंस्था तयार करून लोकांच्या रोजच्या बचतीतून लाखोंची रक्कम गोळा केली व तेच पैसे वेगवेगळ्या लोकांना नवीन असल्याचे सांगून अधिक नफा कमावल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी मालाड पोलीस पुढील तपास करत आहेत.