गुप्तधन सापडल्याचे सांगून लाखो रूपयांची फसवणूक, मुंबईच्या कस्तुरबा मार्ग पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या
Mumbai Crime News : गुप्तधन सापडल्याचे सांगून लाखो रूपयांची फसवणूक करणाऱ्या ठग टोळीतील चार जणांना कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली आहे.
Crime News : घरामध्ये खोदकाम करताना जमिनीतून गुप्तधन सापडल्याचे सांगून लाखो रूपयांची फसवणूक करणाऱ्या ठग टोळीतील चार जणांना कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून पाच किलो बनावट सोने जप्त करण्यात आले आहे. दागिन्यांसह पोलिसांनी संशयितांकडून दहा लाख रूपयांची रोकड देखील जप्त केली आहे. विजयकुमार प्रेमप्रकाश राय (वय, 33), विनय मणिलाल परमार (वय, 20), मणिलाल गोमासिंग परमार ( वय, 43) आणि जीवदेवी मणिलाल परमार (वय, 63) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून या सर्वांना शिवपार्क भाटपाडा विरार येथून अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कस्तुरबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका वृद्धाने याबाबतची फिर्याद दिली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी ठग टोळीच्या सदस्यांनी गुप्तधन मिळवून ते गुपचूप विकल्याचे सांगून 30 लाख रूपयांना गंडा घालून फरार झाले होते, असे तक्रारदाराने आपल्या तक्रारीत म्हटले होते.
कस्तुरबा पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अनेक पथके तयार करून या प्रकरणाचा तपास सुरू केला. गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला असता यातील एक संशयीत आरोपी मेरठमध्ये सापडला. तो उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. या गुंड टोळ्या मुंबईतील विविध भागात जाऊन आधी लोकांना खरे सोने दाखवतात, नंतर पैसे घेतात आणि बनावट सोन्याचे दागिने देऊन फरार होतात, अशी माहिती संशयिताकडून मिळाली. कसून चौकशी केल्यानंतर त्याने आपल्यासोबत आणखी तिघे जण असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी उर्वरित तिघांना ताब्यात घेतले.
दरम्यान, इतर तिघांना पोलिसांनी मुंबईतील शिवपार्क भाटपाडा येथून अटक केली. यावेळी हे तिघे जण दुसऱ्या एका व्यक्तीला फसवण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी पोलिसांनी संशयितांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून पोलिसांनी पाच किलो बनावट सोने आणि दहा लाख रूपायंची रोकड जप्त केली आहे.
बोरिवली कस्तुरबा मार्ग पोलिसांनी या आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांसोबत आणखी काही साथीदार आहेत का आणि या आरोपींनी मुंबई शहरात आणखी किती लोकांना फसवलं आहे या संदर्भात अधिक तपास कस्तुरबा मार्ग पोलिस करत आहेत आहेत अशी माहिती परिमंडळ 12 च्या पोलिस उपायुक्त स्मिता पाटील यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या