International Loan App Crime : आंतरराष्ट्रीय कर्ज अॅप फसवणुकीचा सायबर पोलिसांकडून पर्दाफाश; 14 आरोपींना अटक
International Loan App Crime : मुंबई क्राईम ब्रँचच्या सायबर पोलिसांनी “आंतरराष्ट्रीय कर्ज अॅप फसवणुकी"चा पर्दाफाश केला आहे.
International Loan App Crime : मुंबई क्राईम ब्रँचच्या सायबर पोलिसांनी “आंतरराष्ट्रीय कर्ज अॅप फसवणुकी"चा पर्दाफाश केला आहे. ज्यामध्ये जून आणि जुलैमध्ये अटक केलेल्या किमान 14 आरोपींच्या टोळीने अनेक भारतीयांची 300 ते 350 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. या संदर्भात पोलिसांनी सांगितले की, किमान सहा आरोपी क्रिप्टो चलन वापरत होते. ज्याचा वापर परदेशात असलेल्या मास्टरमाईंडला पैसे उकळण्यासाठी केला जात होता.
संदीप कोरगावकर (38) या पश्चिम उपनगरातील सेल्समनने 4 मे 2022 रोजी आत्महत्या केली होती. कर्जवसुली एजंटने त्याला 50 हून अधिक वेळा कॉल करून त्याचे मॉर्फ केलेले नग्न फोटो त्याच्या परिसरात लोकांना आणि कार्यालयातील महिला सहकाऱ्यांना पाठवले होते. या प्रकरणानंतर छोट्या छोट्या रकमेचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांवर प्रचंड दबाव आणण्यात आला होता. दडपणाखाली कोरगावकर यांनी जीवन संपवण्यापूर्वी कुरार पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यांनी 'नॉन-कॉग्निझेबल' तक्रार नोंदवली. त्याच्या मृत्यूनंतर सायबर पोलिसांनी कर्ज अॅप फसवणुकीच्या प्रकरणांचा तपास सुरू केला.
10 अॅप्समधून लुटले चक्क 3.85 लाख रूपये :
सायबर पोलिसांनी तपास केलेल्या प्रकरणांपैकी एका व्यक्तीने 10 अॅप्समधून 3.85 लाख रुपये घेतले होते. कोरगावकर यांच्याप्रमाणेच 50 वेगवेगळ्या नंबरवरून फोन करून त्याच्याकडून 15 लाख रुपये उकळणाऱ्या लोकांकडून त्रास देण्यात आला. सायबर पोलिसांनी कोरगावकरला आलेल्या कॉलच्या तांत्रिक पुराव्याच्या आधारे पहिला आरोपी सुधाकर रेड्डी (25) याला 24 जून रोजी आंध्र प्रदेशातील कुरनूल येथे शोधून काढले. रेड्डी यांनी कर्नाटकातील बेंगळुरू, हरियाणातील गुडगाव मुंबईतील मालाड, उत्तराखंडमधील नैनिताल आणि मणिपूरमधील कांगोकपी येथून अटक करण्यात आलेल्या 13 जणांची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर या आरोपींना अटक करण्यात आले. यामधील बहुतांश आरोपींना बेंगळुरू येथून अटक करण्यात आली असून ते रॅकेट चालवत होते. आरोपींपैकी पाच जणांनी फसव्या कर्ज अॅप कंपन्यांचे संचालक म्हणून काम करून लोकांकडून पैसे घेतले होते.
बॅंक खाती आणि शेल कंपन्यांमार्फत तीन ते चार कोटींचा गैरव्यवहार :
अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी संजय अरोरा (28) हा हरियाणातील गुडगाव येथील असून त्याला 4 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. पोलिसांना त्याच्याकडून 31 एअरटेल सिमकार्डसह (Airtel Sim Card) अनेक सिमकार्ड सापडले जे त्याने बनावट कागदपत्रांवर मिळवले. आणि बँक खाती आणि शेल कंपन्या उघडणाऱ्या इतर आरोपींना दिले. हा सगळा गैरव्यवहार साधारण तीन ते चार कोटींचा सुरु होता. मालाड (पश्चिम) येथून 5 जुलै रोजी अटक करण्यात आलेला आणखी एक आरोपी स्नेह सोमाणी याच्याकडे 95 सिमकार्ड आढळून आली. ज्याचा वापर शेल कंपन्यांची नोंदणी करण्यासाठी आणि बँक खाती उघडण्यासाठी जात होते.
प्रियांशी कंदपाल (24) या चिनी भाषेतील अनुवादक हिला 10 जुलै रोजी नैनिताल येथून अटक करण्यात आली होती. ती परदेशात बसलेल्या सूत्रधारांच्या संपर्कात होती. ती इतर आरोपींकडून मिळालेल्या माहितीचे इंग्रजीत भाषांतर करून चायनीज भाषा बोलणाऱ्या सूत्रधारांना देत असे. ती 10 सिम कार्ड वापरत होती आणि एक कंपनी चालवत होती. या महिला आरोपीचे 130 कोटी रुपयांचे बँकिंग व्यवहार होते. या प्रकरणात अटक करण्यात आलेला शेवटचा आरोपी 39 वर्षीय लियांग शांग असून त्याला 11 जुलै रोजी बेंगळुरू येथून अटक करण्यात आली होती. प्रियांशीसारखा शांग मास्टरमाइंडच्या संपर्कात होता आणि त्यांच्याशी चिनी भाषेत बोलत होता. फसवणुकीची चांगली माहिती असल्याने त्याने विदेशी आरोपींसाठी शेल कंपन्या उघडल्या. पोलिसांना त्याच्या लॅपटॉपमधून पॉर्नचा 80 जीबी डेटा सापडला आहे ज्याचा वापर अनेक महिलांसह पीडितांचे व्हिडिओ मॉर्फ करण्यासाठी केला जात असल्याचा संशय आहे.
आरोपी लियांग शांग हा क्रिप्टोकरन्सीचा वापर करून परदेशात त्याच्या मालकांना पैसे पळवून लावत असल्याचा संशय आहे. आरोपी “NX क्लाउड टेली” नावाच्या डायलरचा वापर करत होते ज्याद्वारे आरोपींना शोधता न येणारे आउटगोइंग कॉल केले जाऊ शकतात आणि पीडितांना कॉल करणारे वेगवेगळे मोबाईल नंबर पाहता येतात. संचालक म्हणून काम केलेले आरोपी डिंग टॉक, टेलिग्राम आणि व्हॉट्सअॅप यांसारख्या अॅप्लिकेशन्सचा वापर करून परदेशात त्यांच्या मालकांशी बोलायचे. आरोपींना अटक होणार हे माहीत असल्याने त्यांनी तांत्रिक पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तसेच, त्यांच्या विदेशी मास्टर्सचा शोध घेण्यासाठी फॉरेन्सिक चौकशी अजूनही सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Mumbai Crime : 21 हून अधिक महिलांचे अश्लील व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल, मुंबई पोलिसांकडून गुजरातमधील 19 वर्षीय तरुणाला बेड्या
- Nagpur : अंत्यसंस्कारासाठी सरण पेटवताना मोठी दुर्घटना; दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू
- Solapur : फेसबुक ग्रुपमुळं अख्खं गाव वैतागलं; बदनामी केल्याचा आरोप करत गावकरी महिला एसपी कार्यालयात