Mumbai Crime: दिवाळीत फटाके फोडण्यावरून वाद, अल्पवयीन मुलांनी केली तरूणाची हत्या
सुनील शंकर नायडू असे मृत तरुणाचे नाव आहे. गोवंडी शिवाजीनगर भागात म्हाडा कॉलनीमध्ये सुनील राहण्यास होता. काल दुपारी त्यांच्या इमारतीमधील एक बारा वर्षाचा मुलगा इमारतीबाहेर फटाके फोडत होता.
मुंबई : काचेच्या बाटलीत फटाके फोडू नका असे सांगितले, म्हणून तीन अल्पवयीन मुलांनी एका 21 वर्षीय तरुणाची हत्या केल्याची घटना सोमवारी घडली आहे. गोवंडी येथील शिवाजीनगर भागात सोमवारी दुपारी ही घडली आहे. या हत्येने परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुनील शंकर नायडू असे मृत तरुणाचे नाव आहे. गोवंडी शिवाजीनगर भागात म्हाडा कॉलनीमध्ये सुनील राहण्यास होता. काल दुपारी त्यांच्या इमारतीमधील एक बारा वर्षाचा मुलगा इमारतीबाहेर फटाके फोडत होता. त्याने एका काचेच्या बाटलीमध्ये फटाके फोडले. हे पाहून त्याला सुनील ओरडला काच उडून सर्वांना लागेल असे सांगून त्याने त्या मुलाला मनाई केली. याचा राग डोक्यात ठेवून या मुलाने त्याचा 15 वर्षीय भाऊ आणि 14 वर्षीय मित्राला हे सांगितले. या तिघांनी सुनीलला इमारतीजवळ गाठले. तिथे त्याला जबर मारहाण केली. त्यानंतर 15 वर्षीय मुलाने त्याच्या मानेत चाकू खुपसला.
चाकू मारल्यानंतर सुनील या तिघांच्या मागे पळाला. त्यानंतर सुनील तीन मजले इमारती धावत मागे गेला. मात्र परत येताना जिन्यात कोसळला. ही सगळी घटना इमारतीमधील आणि आजूबाजूच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. स्थानिक नागरिकांनी राजावाडी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आणि यातील दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून एकाच शोध सुरू आहे.