Mumbai Crime : फेसबुकवर दिसायची 'ती', समोर यायचा 'तो'; नोकरी देतो सांगून तरुणांचा मोबाईल घेऊन काढायचा पळ
Mumbai Crime News : फेसबुकवर दिसायची 'ती', समोर यायचा 'तो'; नोकरी देतो सांगून तरुणांचा मोबाईल घेऊन पळ काढणाऱ्या चोरट्याला कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे.
Mumbai Crime News : लाखो-कोट्यवधींचा ऑनलाईन गंडा घातल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या आहेत. अनेकदा सोशल मीडियावर ओळख काढून अनेकांची फसवणूक झाल्याचं पाहिलं आहे. अशाच एका ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. हा तरुण सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करुन तरुणांना आपल्या जाळ्यात ओढत असे आणि नोकरीचं अमिष दाखवून त्यांना गंडा घालत असे. सध्या या चोरट्याला पोलिसांनी जेरबंद केलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेला आरोपी सोशल मीडियावर मुलींच्या नावानं फेसबुक अकाउंट सुरु करायचा आणि डिपी म्हणून सुंदर तरुणींचे फोटो ठेवायचा. त्यानंतर त्या अकाउंटवरुन तरुणांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायचा. तरुणांनी फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट केल्यानंतर त्यांच्याशी गप्पा मारुन त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करायचा. तरुण आपल्या जाळ्यात पूर्णपणे ओढले गेल्याची खात्री पटल्यानंतर मुंबईतील मोठ्या सरकारी रुग्णालयात नोकरी देतो, असं सांगून त्यांना भेटण्यासाठी बोलवायचा.
मोठ्या सरकारी रुग्णालयात नोकरी मिळणार म्हणून तरुणही क्षणाचाही विलंब न लावता भेटण्यासाठी तयार व्हायचे. भेटीसाठी गेल्यावर तरुणांना तिथे तरुणी नाहीतर, खोट्या अकाउंट बनवणारा आरोपी भेटायचा आणि त्यांच्याकडून नोकरीसाठी एक फॉर्म भरुन घ्यायचा. काही वेळातच मोबाईलवर फॉर्म भरुन घेता-घेता तरुणांचं लक्ष विचलीत करुन मोबाईल घेऊन पसार व्हायचा. असा घटनाक्रम आरोपीचा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होता.
सध्या कांदिवलीतील पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे. पोलीस चौकशीदरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी कांदिवली पश्चिममधील शताब्दी रुग्णालयात एका तरुणाला नोकरी देतो सांगून बोलावलं आणि फॉर्म भरण्याच्या बहाण्यानं त्याचा मोबाईल घेऊन तिथून पळ काढला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपीनं केवळ कांदिवली शताब्दी रुग्णालयातच नाही, तर मुंबईच्या जुहू पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या कूपर रुग्णालयातही तरुणांना नोकरी देण्याचं अमिश देऊन बोलवायचा आणि फॉर्म भरण्याच्या बहाण्यानं त्यांच्या मोबाईल घेऊन पळ काढायचा. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी जे मोबाईल घेऊन पळ काढायचा. ते सर्व मोबाईल ओएलएक्सवरुन विकायचा.
सध्या कांदिवली पोलिसांनी फेसबुकवरुन गंडा घालणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश केला असून त्याला अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचं नाव हामिद सलीम शेख असून त्याचं वय 28 वर्ष आहे. या आरोपीनं रुमेषा सिद्दीकी नावानं आपलं बनावट फेसबुक अकाउंट तयार केलं होतं. या आरोपीच्या विरोधात 4 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तसेच सध्या पोलीस याप्रकरणी कसून तपास करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :