Mumbai Crime : लैंगिक छळ करून फूटपाथवर राहणाऱ्या महिलेची हत्या; आरोपीला बेड्या
Mumbai Crime News : लैंगिक छळ करून फूटपाथवर राहणाऱ्या महिलेची हत्या करण्यात आली असून माथेफिरू आरोपीला गजाआड करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
Mumbai Crime News : साकीनाका येथे एक महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या झाल्याचे प्रकरण ताजे असताना घाटकोपर मध्ये फुटपाथवर रहाणाऱ्या एका महिलेची देखील लैंगिक अत्याच्यार करण्याचा प्रयत्न करीत हत्या झाल्याचे समोर आले आहे. या आरोपीला या अगोदर देखील एका महिलेच्या हत्येच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. सागर निहाल यादव असं या 40 वर्षीय आरोपीचं नाव आहे. पंतनगरमध्ये असलेल्या भाजीमार्केटच्या फुटपाथवर रहाणाऱ्या शोभा जाधव या 52 वर्षीय महिलेची दोन तारखेला हत्या झाली होती. मात्र या प्रकरणात पोलिसांना आरोपी मिळून येत नव्हता. अखेर गुन्हे शाखा आणि पंतनगर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीनं आणि खबऱ्यांच्या सहाय्यानं शोध घेतला. मानखुर्दमध्ये या आरोपीला बेड्या ठोकण्यात यश आलंय.
पंतनगर पोलिसांसह गुन्हे शाखेच्या युनिट पाचने या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी चार पथकं नेमली होती. या पथकांना तपास करताना काही अस्पष्ट सीसीटीव्ही फोटेजवरून 30 ते 40 वयाच्या माणसानं ही हत्या केल्याचं समजलं होतं. यातून पोलिसांनी मुंबईमधील विविध भागांतील सीसीटीव्ही तपासून त्याचं स्पष्ट चित्र मिळविलं. आणि याच चित्राच्या आधारावर तपास केला असता त्याने वाशीमध्ये देखील एका महिलेची हत्या केल्याचं उघड झालं.
वाशीत एका महिलेची हत्या केल्याच्या प्रकरणात आरोपी नुकताच तळोजा कारागृहातून बाहेर आला होता. त्यानंतर तो थेट घाटकोपर येथे आला. इथे तो शोभाला भेटला. शोभा आणि सागर हे काही वर्षांपूर्वी एकमेकांना ओळखत होते. शोभा आणि तिच्या दिलीप नावाच्या साथीदारासह तेव्हा सागरचे भांडण झालं होतं. गेल्या बऱ्याच दिवसांपासून याचा राग त्याच्या मनात होता. 2 नोव्हेंबरला जेव्हा तो शोभाला भेटला तेव्हा त्यानं तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिनं विरोध केल्यावर बँडेड पट्टीनं तिचा गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर भेदरलेल्या आरोपीनं तिथून पळ काढला. मात्र मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा विभाग आणि पंतनगर पोलिसांच्या कसून तपासमुळे या आरोपीला बेड्या ठोकण्यात यश आलं. त्याने आणखी काही महिलांबाबत असे काही गुन्हे केलेत का? हा सिरीयल किंवा सायको किलर आहे का? याचा पोलीस तपास करीत आहेत. तसचे या घटनेनं सभोवतालच्या परिसरात खळबळ पसरली असून भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Chandrapur Crime : चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवतीचा वाहन चोरीचा गोरखधंदा; पोलिसांकडून बेड्या
- Aurangabad Crime: प्रेयसीच्या घरात गळफास लावून प्रियकराची आत्महत्या, कारण ऐकून पोलीसही चक्रावले
- Gadchiroli Naxal: गडचिरोलीत पोलीस चकमकीत कमांडर मिलिंद तेलतुंबडेसह 26 नक्षल्यांचा खात्मा, शोधमोहिम सुरु, गृहमंत्र्यांकडून कौतुक