(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Crime : मामाऐवजी भाच्याला संपवलं, मिरा रोडमधील डिलिव्हरी बॉयच्या खून प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
मुंबईजवळच्या मिरा रोड इथे सोमवारी झालेल्या डिलिव्हरी बॉयच्या हत्येप्रकरणी काशिमिरा पोलिसांनी नऊ जणांना अटक केली. त्यांच्या चौकशीतून समोर आलेली बाब धक्कादायक आहे. मामाला माराण्याऐवजी मारेकऱ्यांनी भाच्याची हत्या केली.
Mumbai Crime : मुंबईजवळच्या मिरा रोड (Mira Road) इथे सोमवारी (30 जानेवारी) झालेल्या डिलिव्हरी बॉयच्या (Delivery Boy) हत्येप्रकरणी काशिमिरा पोलिसांनी नऊ जणांना अटक केली. त्यांच्या चौकशीतून समोर आलेली बाब धक्कादायक आहे. कारण या प्रकरणात संबंधित डिलिव्हरी बॉयचा नाहक बळी गेला. मामाला मारण्याऐवजी मारेकऱ्यांनी भाच्याची हत्या केली. पेट्रोल पंपावर बाईक पुढे घेण्याच्या किरकोळ वादातून ही हत्या झाल्याचं उजेडात आलं आहे
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे नऊ आरोपींना बेड्या
मिरा रोडच्या जांगीड सर्कलजवळ 30 जानेवारी रोजी अंकुश राजेशकुमार राज या 20 वर्षीय तरुणाची भर रस्त्यात नऊ जणांनी चाकू भोसकून हत्या केली होती. या घटनेचं सीसीटीवी फुटेजही ही व्हायरल झालं होतं. सीसीटीवी फुटेजच्या आधारे काशिमिरा गुन्हे शाखा क्रमांक 1 ने या हत्याकांड प्रकरणात नऊ जणांना अटक केली. त्यांच्यावर भादंवि कलम 302, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या सगळ्यांची चौकशी केली असता, त्यातून समोर आलेलं कारण आश्चर्य करणारं होतं.
मामाला शोधायला आले आणि भाच्यावर हल्ला केला
अंकुश राज हा एका ई-शॉपिंग कंपनीसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. मृत अंकुशचा मामा हर्ष राज आणि आरोपी आयुष भानूप्रसाद सिंह यांच्यात पेट्रोल पंपावर बाईक पुढे घेण्यावरुन किरकोळ वाद झाला होता. त्यावेळी मयत अंकुशने हा वाद मिटवलाही होता. मात्र काही वेळाने आरोपी आपल्या साथीदारांसह हर्षला शोधत आले. यावेळी त्यांना अंकुश दिसला. तो काही कामानिमित्त एका ठिकाणी उभा होता. त्यावेळी नऊ जणांनी त्या ठिकाणी येत अंकुशवर प्राणघातक हल्ला केला. या आरोपींनी चाकू भोसकून अंकुशला गंभीररित्या जखमी केलं आणि हल्ला करुन सर्व आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले. प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अंकुशला जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
नऊ जणांना बेड्या
पोलिसांनी या प्रकरणात नऊ आरोपींना अटक आहे. आयुष भानुप्रसाद सिंह (वय 19 वर्षे) हा या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी आहे. तर अकीच खालिद अन्सारी (वय 20 वर्षे) शेख फरहान नजरे आलम (वय 18 वर्षे) अरमान हबीब लदाफ (वय 18 वर्षे) हैदर पैंगबर पठाण (वय 18 वर्षे), अशपाक अख्तर मन्सूर (वय 25 वर्षे), मेहताब रहीमुद्दीन खान (वय 22 वर्षे), अमित सौरव सिंह (वय 22 वर्षे), सरवर हुसेन शफीकुल्ला खां, अशी अटक केलेल्या उर्वरित आरोपींची नावं आहेत