Shivsena MP Rahul Shewale : खासदार राहुल शेवाळे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल
Shivsena MP Rahul Shewale : शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Shivsena MP Rahul Shewale: शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबईतील अंधेरी महानगर दंडाधिकारी कोर्टाच्या निर्देशानंतर साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी भारतीय दंड विधान संहिता 156 (3) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
काही महिन्यांपूर्वी एका महिलेने शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप केला होता. या महिलेने साकीनाका पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती. खासदार राहुल शेवाळे यांनी आपण कोणत्याही चौकशीसाठी तयार असल्याचे म्हटले होते. खासदार राहुल शेवाळे यांनी 12 मे रोजी अंधेरी महानगर दंडाधिकारी कोर्टात सदर महिलेविरोधात दाद मागितली होती. त्यानंतर कोर्टाने सुनावणी करत महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. आर्थिक फायद्यासाठी जाणीवपूर्वक प्रतिष्ठित व्यक्तीची प्रतिमा मलीन करणे, खासदार राहुल शेवाळे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देणे आणि ब्लॅकमेल करणे या आरोपाखाली साकीनाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सदर महिलेच्या विरोधात साकीनाका पोलीस अधिक तपास करत आहे.
एप्रिल महिन्यात या महिलेने खासदार शेवाळे यांच्याविरोधात आरोप केले होते. त्यावेळी राहुल शेवाळे यांनी हे आरोप फेटाळून लावले. या महिलेने केलेले आरोप निराधार असल्याचे त्यांनी म्हटले होते. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रतिमा डागाळण्यासाठी आणि खंडणी वसुलीसाठी हे आरोप करण्यात आल्याचा दावा शेवाळे यांनी केला होता. मुंबई पोलीस आणि न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास असल्याचे शेवाळे यांनी स्पष्ट केले होते.
दरम्यान, याआधी शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावरदेखील एका युवतीने बलात्काराचा आरोप केला होता. त्यांच्याविरोधात गुन्हाही नोंदवण्यात आला होता. त्यानंतर या पीडित युवतीने आपल्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आरोप करण्यासाठी दबाव टाकला असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली होती. तर, चित्रा वाघ यांनी हे आरोप फेटाळून लावले होते.