Mumbai Crime : पत्नीचे अनैतिक संबंधं असल्याचा संशय, पतीने पत्नी आणि तीन वर्षीय मुलावर केमिकल फेकलं
Mumbai Crime : मालाडच्या मालवणी परिसरात एका 34 वर्षीय व्यक्तीला आपल्या 24 वर्षीय पत्नी आणि तीन वर्षीय मुलाच्या चेहऱ्यावर कथितरित्या केमिकल फेकण्याच्या आरोपात अटक केली आहे.
Mumbai Crime : देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नी आणि तीन वर्षांच्या चिमुकल्यासह असं कृत्य केलं जे ऐकून थरकाप उडेल. मालाडच्या मालवणी परिसरात एका 34 वर्षीय व्यक्तीला आपल्या 24 वर्षीय पत्नी आणि तीन वर्षीय मुलाच्या चेहऱ्यावर कथितरित्या केमिकल फेकण्याच्या आरोपात अटक केली आहे. हा व्यक्ती बेरोजगार होता. पत्नीच्या ज्या खासगी कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करते तिथल्या पुरुषासोबत तिचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीला होता. त्याचाच राग येऊन आरोपीने हे घृणास्पद कृत्य केलं.
महिला आणि मुलाचा आरडाओरडा ऐकून शेजारी धावले
हा व्यक्ती मालाडमध्ये एका चाळीत राहतो. रात्री दोनच्या सुमारास तो घरी गेला आणि दरवाजा ठोठावू लागला. पत्नीने दरवाजा उघडताच त्याने तिच्यावर केमिकल फेकलं. एवढंच नाही तर या विकृत व्यक्तीने आपल्या तीन वर्षांच्या निरपराध मुलावरही केमिकलने हल्ला केला. पीडितांच्या आरडाओरडा ऐकून शेजारी धावून आले. या व्यक्तीने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु शेजारच्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.
महिलेचा चेहरा आणि छाती भाजला
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित पत्नी आणि मुलावर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या केमिकल हल्ल्यात महिलेचा चेहरा आणि छाती भाजली आहे. तर तिचा मुलगा आईजवळ उभा असल्याने त्याचे ओठ भाजले आहेत. या जोडप्याचं चार वर्षांपूर्वी लग्न झाला होता पण पती-पत्नी यांच्यामध्ये कायम भांडणं व्हायची. दोन वर्षांपूर्वी ते वेगळे झाले आणि एक वेगळ्या खोलीत राहत होते. पीडित महिला कामावर जाण्यापूर्वी तिच्या मुलाला आईच्या घरी सोडायची आणि रात्री घरी घेऊन यायची.
दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याकडील केमिकलची बाटली ताब्यात घेऊन ती न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवली आहे. हे केमिकल नेमकं काय आहे आणि किती धोकादायक आहे हे तपासणीनंतर स्पष्ट होईल.