(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गुजरातमध्ये ड्रग्ज तयार करायचा अन् मुंबईत विकायचा, 7000 कोटींचं ड्रग्ज बनवणाऱ्या मास्टरमाईंडला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Mumbai Crime News : मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तब्बल सात हजार कोटी रूपयांचे ड्रग्ज बनवणाऱ्या मास्टरमाईंडला बेड्या ठोकल्या आहेत. संशयित गुजरातमध्ये ड्रग्ज तयार करायचा आणि मुंबईत त्याची विक्री करत असे.
Mumbai Crime News : मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल सात हजार कोटी रूपयांचे ड्रग्ज बनवणाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. प्रेम प्रकाश सिंह असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांना त्याच्या बॅंक खात्यात दोन कोटी रूपयांची रक्कम मिळून आली असून तब्बल शंभर कोटी रूपयांचे व्यवहार त्याच्या खात्यावरून झाल्याचे तपासात पुढे आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रेम प्रकाश सिंह हे ड्रग्ज बनवत असल्याची देखील पोलिसांना माहिती मिळाली आहे. पोलिसांनी त्याचे हे बॅंक खाते गोठवले असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.
प्रेम प्रकाश सिंह याच्याकडे कसून चौकसी केल्यानंतर पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. प्रेम प्रकाश सिंह याने उत्तरांचल विद्यापीठातून रसायनशास्त्राचे शिक्षण घेतले आहे. सिंह याने यापूर्वी एका केमिकल कंपनीत सल्लागार म्हणून काम केले असून त्यानंतर त्याने स्वत:ची श्रेया केमिकल्स नावाची कंपनी सुरू केली. या कंपनीच्या वेबसाइटवर त्याने सुमारे 110 केमिकलची माहिती टाकली. या 110 केमिकलशी संबंधीत आमची कंपनी काम करते असा वेबसाईटवर उल्लेख केला, अशी माहिती मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक सेलचे डीसीपी दत्ता नलावडे यांनी दिली.
डीसीपी नलावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांपासून प्रेम प्रकाश सिंह हे ड्रग्ड बनवत होता. त्यातून त्याने कोट्यवधी रूपयांच्या ड्रग्जची विक्री देखील केली आहे. पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्याचे एक बॅंक खाते गोठवले आहे, ज्यामध्ये सुमारे दोन कोटी रुपयांची रक्कम मिळाली आहे. याशिवाय त्याच्या खात्यातून तब्बल 100 कोटींहून अधिक रक्कमेचे व्यवहार करण्यात आले आहेत. ड्रग्ज विक्री करून मिलालेल्या पैशांतून त्याने कोट्यवधी रूपयांची मालमत्ता खरेदी केली आहे. ड्रग्ज विक्रीच्या पैसातून त्याने गुजरातमधील भरुचमध्ये 7000 चौरस मीटरचा भूखंड खलेदी केला असून तेथे तो स्वतःची केमिकल कंपनी सुरू करण्याच्या तयारीत होता. परंतु, त्यापूर्वीच त्याचा पोलिसांनी भांडाफोड केलाय.
एका फोनवरून झाला कोट्यधीश
प्रेम प्रकाश सिंह हा ड्रग्ज तयार करत असताना त्याचा एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. फोन केलेल्या व्यक्तीने सिंह याच्याकडे प्रोपियोनिक ऍसिड नावाच्या केमिकलची मागणी केली. त्यासाठी तो मोठी रक्कम द्यायला देखील तयार होता. त्यानंतर सिंह याने स्वत: एमडी ड्रग्ज बनवले आणि त्यातून मोठा नफा कमावला. त्यानंतर त्याने स्वत:ची श्रेया केमिकल नावाने कंपनी सुरू केली. या कंपनीमध्येच तो मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज तयार करू लागला. तो तयार करत असलेल्या ड्रग्जचा खूप घाण वास येत असल्याची तक्रार त्याच्या कंपनीतील कामगारांनी केली. त्यानंतर त्याने आपल्या कंपनीत ड्रग्ज तयार करणे बंद केले. परंतु, आपल्या संपर्कांचा उपयोग करून त्याने गुजरातच्या जीआयडीसीमध्ये असलेल्या इन्फिनिटी रिसर्च अँड डेव्हलपमेंट नावाच्या कंपनीत ड्रग्ज बनवण्याचे काम सुरू केले. तेथे ड्रग्ज बनवून तो मुंबईतील नालासोपारा येथे एका गोदामात ठेवत असे आणि तेथूनच तो त्याची विक्री करत असे, अशी माहिती नलावडे यांनी दिली.
टेलीग्रामवरून संपर्क
ड्रग्जची विक्री करण्यासाठी सिहं हा प्रथम व्हाॅट्सअॅपवरून संपर्क साधत असे. त्यानंतर त्याने टेलीग्रामचा वापर सुरू केला. त्याने ड्रग्जची विक्री करण्यासाठी एक नियम बनवला होता. कोणाला ड्रग्जची खरेदी करायची असेल तर एक - दोन किंलोची खरेदी न करत एकदम 25 किलोंची खरेदी करावी लागेल तरच तो ग्राहकाला ड्रग्ज देत असे. सिहं हा ड्रग्ज बनवत असताना खूपच काळजी घेत होता. कारण मार्केटमध्ये ड्रग्जची विक्री करणारे अनेक जण आहेत मग आपल्या ड्रग्जची कोण खरेदी करणार म्हणून तो स्वत:कंपनीत जाऊन ड्रग्जची तपासणी करत असे आणि चांगल्या गुणवत्तेवर भर देत असे. ड्रग्ज तयार करत असताना जर त्याचा रंग पूर्ण पणे पांढरा नाही झाला तर तो कर्मचाऱ्यांवर ओरडत असे. त्यामुळे चांगल्या गुणवत्तेचे ड्रग्ज तो मार्केटमध्ये आणत होता. त्याचे ड्रग्ज मार्केटमध्ये पाहताच क्षणी विकले जात असे. शिवाय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तो ड्रग्जची किंमत देखील इतरांपेक्षा खूप कमी लावत असे. त्याने आतापर्यंत जवळपास तीन हजार कोटी रूपयांच्या ड्रग्जची मार्केटमध्ये विक्री केली आहे, अशी माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. तपासादरम्यान गुन्हे शाखेने सिंह याच्याकडून तब्बल 4856 कोटींहून अधिक किंमतीचे ड्रग्ज जप्त केले आहे.