Mumbai : इन्स्टाग्रामवरून आर्थिक फसवणूक, सायबर गुन्हे शाखेकडून टोळीचा भांडाफोड, संशयितांमध्ये बँकेचा कर्मचारी
Mumbai : मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर गुन्हे शाखेने आर्थिक फसवणूक (financial fraud) करणाऱ्या टोळीचा भांडाफोड केलाय.
मुंबई : इन्स्टाग्राम (Instagram) अॅपवर मेक मनी होम ऑनलाइन या नावाची लिंक पाठवून नागरिकांची आर्थिक फसवणूक (financial fraud) करणाऱ्या टोळीचा भांडाफोड केलाय. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर गुन्हे शाखेने टोळीवर कारवाई केलीय. या टोळीतील तीन जणांना अटक केली आहे. धक्कादाय बाब म्हणजे याप्रकरणी बॅंकेच्या कर्मचाऱ्याला देखील ही पोलिसांनी अटक केली आहे. विक्रम रंगनाथ केदारे , शैलेश शांताराम कापकर आणि सतीश सुरेश पाटील अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अलीकडे फसवणुकीचे गुन्हे वाढले आहेत. नालासोपारातील आचोळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोशल मीडियाच्या माध्यमातून एका महिलेची 88,600 रुपयांची फसवणूक करण्यात आली होती.
फिर्यादी दिपीका वर्मा यांच्या इन्स्टाग्राम अॅपवर अज्ञात आरोपींनी मेक मनी होम ऑनलाईन या नावाची लिंक पाठवली. त्यानंतर या लिंकमध्ये वर्मा यांची वैयक्तिक आणि त्यांचे खाते असलेल्या बॅंकेची माहिती भरण्यास सांगितले. लिंकवर ऑनलाईन गेम टास्क पूर्ण करण्यास सांगितल्यानंतर वर्मा यांनी ही माहिती भरती. परंतु, माहिती भरून पूर्ण होताच त्यांच्या अकाऊंटमधून 88,600 रुपयांची रक्कम कट झाल्याचा त्यांना मेसेज आला. आपली फसवणूक झाल्याचं कळताच वर्मा यांनी मिरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर गुन्हे शाखेत तक्रार केली.
संशयित बॅंकेचा कर्मचारी
वर्मा यांच्या तक्रारीवरून तपास करुन सायबर सेलने विक्रम रंगनाथ केदारे , शैलेश शांताराम कापकर आणि सतीश सुरेश पाटील या तिघांना अटक केली. धक्कादाय बाब म्हणजे आरोपी सतीश पाटील हा यस बँकेचा कर्मचारी असून, बँक खाते उघडून खोटे के.वाय. सी. उपडेट करण्याचं तो काम करत होता.
पोलीस तपास सुरू
संशयित आरोती विक्रम केदारे याने तेज ट्रेडिंग कंपनीच्या नावावरील यस बँकेतील खात्यावर रक्कम स्वीकारली होती. तर शैलेश कापकर याने खाते काढून देण्यास मदत केली होती. या तिघांचा भांडाफोड सायबर सेलने करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या तिघांनी आणखीन कोणाची फसवणूक केली आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.
नागरिकांना आवाहन
मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील नागरिकांची अशा प्रकारे ऑनलाइन फसवणूक झाली असेल तर तत्काळ त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा www.cybercrime.gov. in अथवा 1930 या हेल्पलाईनवर आपली तक्रार नोंदवावी असे अहवान पोलीस आयुक्तांनी केलं आहे.