राजस्थानात आरोपीवर गोळीबार करणाऱ्या गुंडाला अटक; राजस्थान आणि वालीव पोलिसांची संयुक्त कारवाई
राजस्थानमध्ये न्यायालयात हजर करण्यासाठी नेण्यात येणाऱ्या आरोपीवर शिवरतन राजपूत याने गोळीबार केला होता.
मुंबई : राजस्थानच्या जोधपूर येथे न्यायालयात हजर करण्यासाठी नेलेल्या कैदी पार्टीवर गोळीबार करून, कैदी पार्टीतील एकाचा खून करणाऱ्या मुख्य सूत्रधार गुंडास बोरिवली येथे ताब्यात घेण्यात आले आहे. वसईच्या वालीव आणि राजस्थान पोलिसांनी रविवार रात्री दहाच्या सुमारास ही सयुंक्त कारवाई केली आहे.
शिवरतन उर्फ प्रिन्स भावरसिंग राजपूत असे ताब्यात घेतलेल्या सराईत गुंडाचे नाव असून तो राजस्थान येथील रहिवासी आहे. जोधपूर सिटी पूर्व राजस्थान रातानाडा पोलीस ठाण्यात भादवी कलम 302, 353, 332, 307, 34, 120 (ब), सह आर्म ऍक्ट 3, 25, 27 अन्वये गु्न्हा दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी कालपरी उर्फ प्रदीपपुरी शंकरपुरी गोस्वामी यास 18 डिसेंबर 2021 रोजी राजस्थानच्या पाली येथील न्यायालयात हजर केलं होतं.
त्यानंतर आरोपीला जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात घेऊन जात असताना जोधपूरच्या भाटी चौराह येथे अचानक मोटारसायकल वरून आलेल्या दोघांनी पोलीस ताफ्याच्या ताब्यात असणाऱ्या आरोपी आणि पोलिसांवर सहा गोळ्या फायर करून फरार झाले होते. या फायरिंग मध्ये गोस्वामी या आरोपीचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर आरोपी शिवरतन हा फरार झाला होता.
दोन टोळीच्या वादातून हा प्रकार घडल्याने राजस्थान पोलिसांनी तात्काळ आरोपीना पकडण्यासाठी स्वतंत्र पथक तयार केले होते. हे दोन्ही आरोपी राजस्थान वरून मुंबई, वसई विरार परिसरात असल्याची खात्री पटल्यानंतर राजस्थान पोलीस रविवारी वसईत दाखल झाले होते.
राजस्थान पोलिसांनी वसईच्या वालीव पोलिसांची मदत घेवून, तांत्रिक मदतीचा आधारे आरोपीला रविवारी रात्री 10 च्या सुमारास बोरिवलीच्या एमसीएफ गार्डन येथून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतलं. त्यानंतर राजस्थान पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. मुख्य आरोपी पकडून दिल्याने राजस्थान पोलिसांनी वालीव, आणि मुंबई पोलिसांचे आभार मानले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :