मित्राचा अपमान करणं महिलेला पडलं महागात, सूड उगवण्यासाठी हत्या करून भरलं पोत्यात
Mahim Murder Case: मुंबईत एक खळबळजनक जनक घडल्याचं समोर आलं आहे. अपमानाचा सूड उगवण्यासाठी एका इसमाने आपल्याच मैत्रिणीची हत्या केल्याची घटना घडली आहे.
Mahim Murder Case: मुंबईत एक खळबळजनक जनक घडल्याचं समोर आलं आहे. अपमानाचा सूड उगवण्यासाठी एका इसमाने आपल्याच मैत्रिणीची हत्या केल्याची घटना घडली आहे. या महिलेचा एवढाच दोष होता की, तिने आरोपीशी बोलत असताना एक ते दोन वेळा त्यासाठी अपमानास्पद शब्द वापरले होते. महिलेला वारंवार स्वत:साठी आक्षेपार्ह शब्द वापरल्याचे पाहून दुखावलेल्या आरोपीने तिची हत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. विकास खैरनार असं आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सारिका दामोदर चाळके असे मृत महिलेचे नाव आहे. विकास आणि सारिका हे मुंबईतील गोरेगाव येथील एका खासगी सोसायटीत हाऊसकीपिंगचे काम करायचे. कामादरम्यान दोघांची मैत्री झाली. सुरुवातीचे काही महिने त्यांच्यात चांगली मैत्री होती. मात्र काही काळानंतर वारंवार पैशाचे व्यवहार आणि इतर अनेक कारणांमुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. सारिका बोलताना विकाससाठी आक्षेपार्ह शब्द वापरत होती. अनेकदा इतरांसमोर ती त्याचा अपमान करत होती. याच कारणावरून विकासने सारिकाची हत्या करून तिचा मृतदेह तीन गोण्यांमध्ये बांधून माहीम रेल्वे ट्रॅकजवळ फेकून पळ काढला.
आरोपीला कशी झाली अटक?
मिळालेल्या माहितीनुसार, सारिकाचा मृतदेह ज्या गोणीत ठेवण्यात आला होता, त्यातून या हत्येचे रहस्य उलगडले. महिलेचा मृतदेह ज्या पोत्यात भरला होता, त्यात आरोपींनी गोरेगावचा पत्ता लिहिला होता, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी गोरेगाव येथे जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना बातमी मिळाली की, दिंडोशी पोलीस ठाण्यात एक महिला हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांचा तपास सुरू होता. त्यातच मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी महिला हरवल्याची तक्रार दाखल करणाऱ्या कुटुंबाशी संपर्क साधला. रेल्वे रुळावर सापडलेल्या महिलेचा मृतदेह आणि दिंडोशी पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आलेली महिला दोघी एकच असल्याचे तपासात समोर आले. महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले की, ही महिला एका खासगी सोसायटीत घरकाम करायची. सोसायटीतील इतर कर्मचाऱ्यांची चौकशी केल्यानंतर आरोपी विकासचे नाव पुढे आले. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत विकासने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलीस आता याप्रकरणी पुढील कारवाई करत आहेत.