Solapur News : चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला मारहाण केल्याने मृत्यू, सात पोलिसांवर गुन्हा दाखल
Solapur News : चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला मारहाण करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सात पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोलापूर : चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला मारहाण करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सोलापुरतील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ यांच्यासह अन्य पाच पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सप्टेंबर 2021 मध्ये चोरीच्या आरोपत अटकेत असलेल्या आरोपी भीमा रज्जा काळे यास तपास अधिकारी कोल्हाळ आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. याच मारहाणीत जखमी झालेल्या भीमा काळे याचा शासकीय रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाल्याचा आरोप भीमा काळेच्या पत्नीने केला होता. या घटनेनंतर पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांच्यावर तपास अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना न करणे, आरोपीला मारहाण झाल्यानंतर त्याच्या उपचाराकडे दुर्लक्ष करणे, पोलीस ठाण्याच्या आवारात सीसीटिव्ही न बसवल्याचे आरोप करण्यात आले.
गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपधीक्षक श्रीशैल गजा यांची सोलापूरच्या विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद केली. आरोपी पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस कर्मचारिविरोधात 304, 330, 166, 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास गुन्हे अन्वेषण विभागाचे उपाध्यक्ष जी व्ही दिघावकर यांच्याकडे देण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
- घरफोडीनंतर विजापूर पोलिसांनी सुरू केला तपास घरफोडी प्रकरणात पोलिसांनी भीमा रज्जा काळे याला 22 सप्टेंबरला अटक केली
- जिल्हा न्यायालयाने भीमा काळेला दिली होती 25 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी
- पोलिस कोठडीत असताना भीमा काळेला अशक्तपणा, किडनीचा त्रास होऊ लागला
- 24 सप्टेंबरला पोलिसांनी त्याला सिव्हील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले
- सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान 3 ऑक्टोबर 2021 झाला भीमा काळेचा मृत्यू
- पोलीस मारहाणीत मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा होता आरोप
- प्रकरणाची गुन्हे अन्वेषण विभागाने केली होती चौकशी
- चौकशीनंतर गुन्हे अन्वेषण विभागाने पोलिसांविरोधात दिली आहे फिर्याद