Iqbal Kaskar : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर जे. जे. रुग्णालयात दाखल
Iqbal Kaskar : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला प्रकृती अस्वास्थाच्या कारणास्तव जे.जे. रुग्णालयात दाखल केले आहे.
Iqbal Kaskar : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा (Dawood Ibrahim) भाऊ इक्बाल कासकर (Iqbal Kaskar) याला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती अस्वास्थामुळे त्याला जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. इक्बाल कासकर याला रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
इक्बाल कासकर याला शनिवारी दुपारनंतर अचानकपणे त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्याला तळोजा तुरुंगातून मुंबईतील जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हृदयाशी संबधित त्रासामुळे इक्बालला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
इक्बाल कासकर याच्याविरोधात फारसे गंभीर गुन्हे नसल्याने तो पाकिस्तानमधून भारतात परतला होता. मात्र, त्याने दाऊदची धमकी देत खंडणी वसूली सुरू केली होती. इक्बाल कासकरला ठाणे पोलिसांनी 2017 मध्ये खंडणी प्रकरणी अटक केली होती. इक्बाल कासकर सध्या न्यायलयीन कोठडीत असून तळोजा कारागृहात आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत गेल्या वर्षभरात 3 ते 4 वेळा आपला संपर्क झाल्याची कबुली त्याचा भाऊ इक्बाल कासकरने पोलिसांना अटकेनंतरच्या चौकशीत दिली होती. दाऊदसोबत व्हिओआयपी कॉलच्या माध्यमातून संपर्क साधला. त्याचं आपल्या व्यवसायांवर नेहमी लक्ष असंत, अशी माहिती इक्बालने दिली. इक्बालने काल दाऊच्या पाकिस्तानमधल्या 3 घरांची माहिती पोलिसांना दिली.
काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलसह डी-कंपनीच्या सात जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. हे लोक भारतात होत असलेल्या दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याचा दावा तपास संस्थेने केला आहे. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद, जमात-उद-दावा आणि अल कायदा यांसारख्या दहशतवादी संघटनांशी त्यांचे संबंध आहेत.
एनआयएच्या कारवाईनंतर ईडीने मुंबईतील दाऊदशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले होते. या छाप्यांमध्ये दाऊद इब्राहिमची दिवंगत बहीण हसिना पारकर, इक्बाल कासकर आणि छोटा शकीलचा नातेवाईकाशी संबंधित ठिकाणांचा समावेश होता. ईडी दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील मालमत्तांची बेकायदेशीर खरेदी आणि हवाला व्यवहारांची चौकशी करत आहे. ईडीने इब्राहिम कासकरचीदेखील चौकशी केली आहे.