Aurangabad: पिस्तूलचा धाक दाखवत कापूस व्यापाऱ्याचे 27 लाख रुपये लुटले; सोलापूर-धुळे महामार्गावरील घटना
Aurangabad Crime News: घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता.
Aurangabad Crime News: औरंगाबाद शहरातील (Aurangabad City) गुन्हेगारी घटना काही कमी होताना दिसत नाही. त्यातच आता दुचाकीवरून आलेल्या दोघांनी कार अडवून कापूस व्यापाऱ्याला पिस्तूलचा धाक दाखवित मारहाण करत 27 लाख 50 हजार रुपये लुटल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सोमवारी (20 फेब्रुवारी) रात्री आठ वाजेच्या सुमारास सोलापूर-धुळे महामार्गावरील करोडी टोल नाक्याजवळ ही घटना घडली आहे. तर घटनेची माहित मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, साईनाथ मनोहर तायडे (रा. देवळी, लासूर स्टेशन, ता. गंगापूर) हे कापूस व्यापारी आहेत. औरंगाबाद शहरातील गोमटेश मार्केटमधून कापूस खरेदी-विक्रीचे साडे सत्तावीस लाख रुपये घेऊन तायडे हे रात्रीच्या सुमारास लासूर स्टेशनजवळील देवळी या आपल्या गावी जाण्यासाठी निघाले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा कारचालक अनिल भुसारे देखील होता.
दरम्यान, सोलापूर-धुळे महामार्गावरून जात असतानाच, रात्री आठ वाजेच्या सुमारास ते मुंबई- नागपूर महामार्गाकडे जाण्यासाठी करोडी येथील उड्डाण पुलावरून वळण घेताच, दुचाकीवरून आलेल्या दोघांनी तायडे यांच्या कारसमोर दुचाकी आडवी लावली. कार थांबताच दुचाकीस्वारांनी लाकडी दांड्याने तायडे यांच्या कारची काच फोडली. काही समजण्याच्या आताच आरोपींनी तायडे यांच्यावर हल्ला चढविला. त्यांना पिस्तूलचा धाक दाखवून लाकडी दांड्याने मारहाण करून पैशांनी भरलेली 27 लाख रुपये घेऊन फरार झाले.
पाळत ठेवून लुटले...
घटनेची सर्व पार्श्वभूमी पाहिली असता, आधीच सर्व नियोजन करून लुटमार करण्यात आल्याचे दिसून येत आहे. तायडे हे पैसे घेण्यासाठी येणार आहेत, ते कोणत्या मार्गाने जाणार, याची संपूर्ण माहिती आरोपींना आधीपासूनच मिळाली असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. तर याच माहितीवरून करोडी फाट्यावर जेथे वाहनाचा वेग कमी होतो आणि वर्दळ कमी असते, त्या ठिकाणी आरोपींनी संधी साधली, असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पोलिसांकडून सर्व पद्धतीने तपास केला जात आहे.
पोलिसांची घटनास्थळी धाव...
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, दौलताबाद पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनोद सलगर, द. पोलीस निरीक्षक गीते, पोलीस उपनिरीक्षक चेतन ओगले, सचिन वायाळ, पोहेकॉ राजाभाऊ कोल्हे, यशवंत गोबाडे, सूरज अग्रवाल, आयुब पठाण आदींनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.
महत्वाच्या इतर बातम्या :
Student Suicide: धक्कादायक! परीक्षेच्या एक दिवस आधी बारावीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या