Madhya Pradesh Crime : गोवंशाची वाहतूक, ग्रामस्थांचा हल्ला; मध्य प्रदेशातील घटनेत अमरावतीच्या एकाचा मृत्यू, दोघे जखमी
Madhya Pradesh News : गोवंशाची वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या अपघातानंतर ग्रामस्थांचा हल्ला, मध्य प्रदेशातील नर्मदापुरममधील घटनेत अमरावतीच्या एकाचा मृत्यू, दोघे जखमी
Madhya Pradesh News : मध्य प्रदेशातल्या (Madhya Pradesh) नर्मदापूरमध्ये गोवंशानं भरलेल्या एका वाहनाचा अपघात झाला. अपघातनंतर वाहनातली जनावरं पाहून ग्रामस्थांना गोवंश तस्करीचा संशय आला आणि त्यांनी वाहनातल्या चालक आणि अन्य दोन जणांना मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतरही त्यांनी अक्षरशः पाठलाग करत या तिघांना मारलं. पोलिसांनी सुटका करत चालक आणि अन्य दोघांना रुग्णालयात दाखल केलं. मात्र यामध्ये एकाचा मृत्यू झाला. तर दोन जखमींवर उपचार सुरू आहेत. मृत आणि जखमी महाराष्ट्रातल्या अमरावतीचे असल्याची माहिती मिळत आहे.
मध्य प्रदेशातील नर्मदापुरम जिल्ह्यात गुरांनी भरलेला ट्रक झाडावर आदळला आणि उलटला. ट्रकमध्ये गुरे पाहून स्थानिकांचा संताप अनावर झाला. जमावाने ट्रकचा चालक, मदतनीस आणि सहचालकाला मारहाण केली. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. दोघांना गंभीर अवस्थेत पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. त्याचबरोबर या हत्येप्रकरणी पोलिसांनी गौरव यादव, राजू लोधी, आकाश उर्फ पिंटोली आणि आकाश सराठे यांना अटक केली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलीस अधिक्षक गुरकरन सिंह यांनी सांगितलं की, मंगळवारी रात्री गोवंश तस्करांनी भरलेला ट्रक सिओनिमलवा तहसील अंतर्गत असलेल्या बरखार-नांदरवाडा गावावरील एका झाडावर जाऊन आदळला. या अपघातात दोन गुरं जागीच ठार झाली तर अनेक गुरं जखमी झाली. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. गुरांची अवस्था पाहून लोक संतापले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी ट्रकमधील तिघांची गर्दीतून सुटका केली आणि त्यांना रुग्णालयात नेलं, तिथे एकाचा मृत्यू झाला. मृत आणि जखमी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील आहेत. जखमी वाहक आणि चालकाचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाजिर अहमद, शेखलाल आणि मुस्ताक गुरांनी भरलेला ट्रक अमरावतीला घेऊन जात होते. अशातच चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ट्रक झाडावर आदळला. अपघात झाल्यानं घटनास्थळी गर्दी जमली आणि ट्रकमधील गुरं पाहून स्थानिकांना संताप अनावर झाला. गोवंश तस्करीचा संशय आल्यानं जमावानं तिघांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यातीव नाजिर अहमदला गंभीर दुखापत झाल्यानं त्याचा मृत्यू झाला. जखमी ट्रकचालक शेखलाल यानं पोलीस चौकशीत सांगितलं की, नांदरवाडा येथील राजा नावाच्या तरुणानं ट्रकमध्ये गुरं भरली होती. ते बरखार, लोकर्तलाई येथून ढेकणा मार्गे महाराष्ट्रात अमरावतीला पोहोचतात. या मार्गावर पोलीस चौकी नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :