सांगलीच्या व्यक्तीने लातूरच्या तिघांना फसवले, गुप्तचर विभागमध्ये नोकरीचं दिलं आमिष
Latur Latest Crime News : गुप्तचर विभागमध्ये नोकरीचे अमिष दाखवून सांगलीच्या व्यक्तीने लातूरमधील तिघांना वेळोवेळी तब्बल 8 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
Latur Latest Crime News : सांगलीतील एका व्यक्तीने नोकरीचे अमिष दाखवून लातूर येथील तिघांना लुबाडले आहे. गुप्तचर विभागमध्ये नोकरीचे अमिष दाखवून सांगलीच्या व्यक्तीने लातूरमधील तिघांना वेळोवेळी तब्बल 8 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. अभिषेक राजेंद्र वैद्य असे फसवणूक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
लातूर शहरातील विवेकानंद पोलीस चौकीत याबाबत गुन्हा दाखल आहे. कलम 419,420 468,471 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील आरोपीला विवेकानंद पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हा गुन्हा सांगली जिल्ह्यातील मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. आरोपीस मिरज ग्रामीण पोलिसांनाच्या स्वाधीन करण्यात आले आहे. यापूर्वी अश्याच प्रकारचे काही आर्थिक गुन्हे आरोपीकडून घडले आहेत का? याचाही तपास सुरू आहे, अशी माहिती विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी दिली आहे.
दरम्यान, या फसवणूक प्रकरणी सुरज व्यंकटराव सूर्यवंशी (रा. बाभळगाव) याने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, तो आर्या टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करतो. अभिषेक राजेंद्र वैद्य हा त्यांच्या पुणे येथील कार्यालयात आला होता. पाच दिवस त्याला भाड्याने गाडी हवी होती, त्यामुळे त्याची ओळख झाली. आय.बी. मध्ये अधिकारी असल्याचे सांगून ऑफीस कामासाठी गाडी भाड्याने लावायचे म्हटले. इनोव्हा कार क्रमांक एमएच. 45 एन 8777 ही गाडी फिर्यादी स्वतः त्याच्याकडे घेऊन गेला. आय. बी. मध्ये जागा निघाली आहे, दोन लाख रुपये लागतील असे सांगितले. त्यामुळे ही रक्कम त्याच्या आणि त्याच्या आईच्या खात्यावर टाकली.आय.बी. मध्ये नौकरी लागल्याचे पत्र त्याने पाठवले, लॅपटॉप मोबाईल आणि इतर कारणांसाठी त्याने 1 लाख 40 हजार रुपये खात्यावर भरण्यास सांगीतले. गाडी भाड्याने लावलेली रक्कम 95200 रुपये, इन्कमटॅक्सची रक्कम म्हणून 37800 रुपयांची फसवणूक केली. त्याचप्रमाणे अमित पटसाळगे आणि जय संतोष दाहाळे यांच्याकडूनही प्रत्येकी 75 हजार रुपये नोकरी लावण्याचे अमिष दाखवून घेतले आणि फसवणूक केली. या प्रकरणी पोलिसांनी अभिषेक वैद्य याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.