ट्रेनी डॉक्टरवर अत्याचार करुन संपवलं; त्यानंतर आरोपीनं घर गाठलं, झोपला, पुरावे नष्ट करण्यासाठी दुसऱ्या दिवशी कपडे धुतले, पण...
Kolkata Crime : कोलकाता रुग्णालयात महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून खून केलेला नराधम गजाआड, कोर्टाकडून 14 दिवसांची पोलीस कोठडी.
Kolkata Trainee Doctor Crime Case : कोलकात्यामध्ये (Kolkata News) आर. जे. कर राज्य सरकारी रुग्णालयात एका डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली असल्याचं प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. एका इयरबड्सच्या तुकड्यामुळे आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांकडून याप्रकरणी कसून तपास सुरू आहे. कोलकाता रुग्णालयात महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी महिला डॉक्टरच्या हत्येनंतर घरी परतला, झोपला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्यानं दुसऱ्या दिवशी उठून स्वतःचे रक्तानं माखलेले कपडे धुतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येनंतर क्रूर आरोपी त्याच्या घरी गेला, त्यानंतर तो घरातच झोपला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुरावा नष्ट करण्यासाठी त्यानं कपडे धुतले. मात्र, पोलिसांना आरोपीच्या बुटावर रक्ताच्या खुणा आढळल्या. तो महापालिकेचा स्वयंसेवक आहे.
कोलकात्यात संतापाची लाट, तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरू
शुक्रवारी सकाळी एका महिला पोस्ट ग्रॅज्युएट प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह आढळून आला. महिला डॉक्टरवर बलात्कार करुन खून करण्यात आल्याचा आरोप रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये करण्यात आला होता. नागरी संस्थेच्या स्वयंसेवकाला शनिवारी अटक करण्यात आली. या गुन्ह्यासाठी जबाबदार असलेल्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी रविवारी तिसऱ्या दिवशीही निदर्शनं सुरू राहिल्यानं पश्चिम बंगालमधील सरकारी रुग्णालयांतील सेवा प्रभावित झाल्या. कोलकाता पोलीस आयुक्त विनीत गोयल यांनी रविवारी तीन दिवसांत दुसऱ्यांदा वैद्यकीय आस्थापनाला भेट दिली आणि आंदोलनकर्त्या डॉक्टरांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. तपास पारदर्शक असल्याचा दावा त्यांनी केला आणि लोकांनी अफवा पसरवू नका, असं आवाहन केलं.
गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, "गुन्हा केल्यानंतर आरोपी घरी गेला आणि शुक्रवारी सकाळी उशिरापर्यंत झोपला. झोपेतून उठल्यानंतर त्यानं पुरावा नष्ट करण्यासाठी गुन्ह्यादरम्यान घातलेले कपडे धुतले. झडती घेतली असता त्याचे बूट सापडले ज्यावर रक्ताचे डाग होते.
काही लोक आरोप करत असल्यानं या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? असा प्रश्न विचारला, त्यावेळी ते म्हणाले की, "आतापर्यंत तसा कोणताही पुरावा नाही, असं सांगितलं" गोयल म्हणाले की, पोलीस अंतिम पोस्टमार्टम अहवालाची वाट पाहत आहेत, कारण त्यांना त्यांच्या तपासातील निष्कर्षांची सांगड घालायची आहे. एका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेष तपास पथक (एसआयटी) च्या पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकानं फॉरेन्सिक युनिटसह रविवारी हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमधून नमुने गोळा केले.
पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून काय आलं समोर?
चार पानांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये लेडी डॉक्टरच्या शरीराच्या इतर भागांवर जखमा झाल्याचं समोर आलं आहे. अहवालात असं म्हटलं आहे की, मृताचे डोळे आणि तोंड दोन्हीमधून रक्तस्त्राव होत होता, तिच्या चेहऱ्यावर जखमेच्या खुणा होत्या आणि एक खिळा देखील होता. पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्त येत होतं. त्याच्या पोटावर, डाव्या पायावर, मानेवर, उजव्या हाताला आणि ओठांवर जखमेच्या खुणा होत्या.