बड्डेच्या पार्टीचं बिल का भरलं म्हणत मित्रावरच चाकूने हल्ला; कल्याणमधील खळबळजनक घटना
वाढदिवसाच्या पार्टीचे बिल भरले म्हणून मित्रावर चाकूने हल्ला, कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Kalyan Latest Crime News : माझ्या वाढदिवसाच्या पार्टीचे बिल तुझ्या मित्राने का भरले? यावरून झालेल्या वादात एका मित्राने दुसऱ्या मित्रावर चाकूने हल्ला केला आहे. ही खळबळजनक घटना कल्याणमधील गांधारी परिसरात घडली आहे. भाऊराव तायडे असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर कल्याणमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर हल्लेखोर अभय जाधव हा पसार झाला आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात हल्लेखोर अभय जाधव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार अभय जाधव याचा शोध पोलीस घेत आहेत. पार्टीच्या बिलावरून मित्रानेच मित्रावर केलेल्या चाकू हल्ल्याने कल्याण शहरात एकच खळबळ उडाली आहे.
कल्याणजवळ असलेल्या बापगाव परिसरात राहणारे भाऊराव तायडे हे आपल्या कुटुंबासह राहतात. भाऊराव तायडे एका खाजगी कंपनीत कार्यरत आहेत. कल्याणमध्ये राहणारा अभय जाधव हा त्यांचा मित्र आहे. तो एका नामांकित महाविद्यालयात क्लार्क पदावर कार्यरत आहे. 24 तारखेला संध्याकाळी भाऊराव त्यांच्या घरी होते. संध्याकाळी त्याचा मित्र अभय जाधव त्यांच्या घरी आला. अभयने आज माझा वाढदिवस आहे. जेवण करण्यास कुठे तरी जाऊ असे सांगितले. भाऊराव तायडे , अभय व त्यांचे मित्र सुरेश सह काही मित्र एका ठिकणी पार्टीकरीता गेले. पार्टी करण्यासाठी घरी परत जात असताना अभय भाऊराव व मित्रांशी वाद घालू लागला.
अभय याने भाऊराव यांना माझ्या वाढदिवसाच्या पार्टीचे बिल तुझ्या मित्राने का भरले? असे बोलत भाऊराव यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. संतापाच्या भरात अभयने भाऊराव यांच्या सोबत असलेल्या सुरेशवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरेशने तेथून पळ काढला. त्यानंतर अभयने चावीच्या गूछातील चाकू काढत भाऊराव तायडे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तायडे यांच्या पोटाला दुखापत झाली आहे. दरम्यान अभय जाधव त्या ठिकाणाहून पसार झाला. भाऊराव यांच्या पोटाला दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी कल्याणमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे .या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी अभय जाधवच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे .पोलीस या प्रकरणी तपास करत असून पोलीसानी फरार झालेल्या अभय जाधवचा शोध सुरु केला आहे.
ही बातमी देखील वाचा -