Kalyan Crime News : दांडिया खेळताना बहिणीला धक्का देणाऱ्या तरुणाला जाब विचारला; भावावर तिघांचा प्राणघातक हल्ला
Crime News: एका गरब्यात दांडिया खेळताना टवाळखोर तरुणाने बहिणीला धक्का दिल्याचा जाब विचारणाऱ्या भावावर टवाळखोरांनी प्राणघातक हल्ला केला
कल्याण : एका गरब्यात दांडिया खेळताना टवाळखोर तरुणाने बहिणीला धक्का दिल्याचा जाब विचारणाऱ्या भावावर टवाळखोरांनी प्राणघातक हल्ला केला. तिघांनी मिळून जाब विचारणाऱ्या भावाला बेदम मारहाण केली. पाय फ्रॅक्चर करत त्याच्यावर गरब्यातच धारधार हत्याराने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण पूर्वेतील (Kalyan East) नेतिवली (Netiwali) येथील प्रबोधकार ठाकरे शाळेच्या मैदानात घडली. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात (Kolsewadi Police Station) तिन्ही हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मंजुमील अहमद शेख (वय 19) असे हल्ल्यात गंभीर झालेल्या भावाचे नाव आहे. तर अमन आणि त्याचे अनोखळी दोन साथीदार असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
देशभरात नवरात्रीमध्ये ठिकठिकाणी धुमधडाक्यात तरुणाई गरब्यांमध्ये दांडिया खेळताना दिसते. कल्याण पूर्वेतील नेतिवली येथील प्रबोधकार ठाकरे शाळेच्या मैदानात गरब्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यातच 23 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास या ठिकाणी जखमी मंजुमील हा आपल्या 17 वर्षीय अल्पवयीन बहिणीसह मित्रांसोबत गरब्यात वेगळा सर्कल करून दांडिया खेळत होता. तर आरोपी तरुणदेखील दांडिया खेळत असतानाच अल्पवयीन बहिणीला धक्का दिल्याचे भावाने पाहिले. या घटनेचा जाब विचारला असता दोघांमध्ये दांडिया सुरू असतानाच वाद झाला. मात्र, काही क्षणात हा वाद विकोपाला गेला आणि आरोपींनी भावाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी भावाला वाचविण्यासाठी बहिणी आली असता, तिला धक्काबुकी करत तिच्या डोक्याचे केस पकडून तिला जोरदार धक्का दिला. त्यानंतर आरोपींपैकी एकाने धारधार हत्याराने वार करून भावाला गंभीर जखमी केले. या घटनेमुळे गरबा कार्यक्रमात एकच पळापळ झाली होती.
दरम्यान गंभीर जखमी अवस्थेत भावाला त्याच्या मित्रांनी एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. हत्याराने वार केलेल्या ठिकाणी 17 टाके पडले असून एक पाय फ्रॅक्चर झाला आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे जखमी मंजुमील शेख याच्या तक्रारीवरून कोसळेवाडी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात भादंवि कलम 324, 323, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
मात्र जखमी तरुणाच्या मते पोलिसांनी अल्पवीयन बहिणीशी केलेली छेडछाड प्रकरणी गुन्हा दाखल केला नसल्याचे सांगत पोलिसांच्या तपासावर सवाल उपस्थित केला. या संदर्भात या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पोलिसांशी मोबाईलवर संपर्क साधला असता या गुन्ह्यातील एकही आरोपी अटक केला नसून आरोपींचा शोध सुरू असल्याचे सांगितले.