Crime News : दारू पार्टीत किरकोळ वाद झाला...धमकी देऊन मोबाईल चार्जरच्या वायरने मित्राला संपवलं
Kalyan Crime : दारूचे पेग रिचवताना दोन मित्रांमध्ये किरकोळ वाद झाला. मात्र, या वादातून एकाने आपल्या मित्राची मोबाईल चार्जरच्या वायरने हत्या केली.
कल्याण, ठाणे : दारुच्या नशेत बऱ्याच जणांचे वाद, भांडण होतात. मात्र, दारू उतरली की अनेकांना काही तासांपूर्वी काय झाले, हेदेखील आठवत नसते. मात्र, दारू पार्टीत झालेला किरकोळ वाद एकाचा जीवावर बेतला आहे. मित्रानेच दारूच्या नशेच्या वादातून मित्राची मोबाईल चार्जरच्या वायरने (Mobile Charger Wire) गळा आवळून हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना कल्याण पूर्व (Kalyan East) खडेगोळवली परिसरात उघडकीस आली.
या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात (Kolsewadi Police Station) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. तर, आरोपी हिरालाल निषाद याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर, अनिलकुमार प्रजापती यादव असे खून झालेल्या मित्राचे नाव आहे.
मृत अनिलकुमार यादव आणि आरोपी हिरालाल निषाद हे दोघे मित्र भाड्याच्या रूम मध्ये राहत होते. कल्याण पूर्वेतील खडेगोळवली परिसरात एका चप्पलेच्या कारखान्यात काम करणारे होते. हे दोन्ही मित्र एका ठिकाणी पार्टी करण्यास बसले होते. त्यावेळी या दोघांमध्ये किरकोळ वाद झाला होता. या वादाच्या दरम्यान आरोपी हिरालालने 'आज तुझे रात को देखता हूं' अशी धमकी दिली.
आरोपी हिरालाल हा अनिलकुमार झोपायची वाट पाहत होता. त्यानंतर अनिलकुमार हा झोपल्याचे पाहून आरोपी हिरालालने त्याची हत्या केली. पहाटेच्या सुमारास हिरालालने मोबाईल चार्जरच्या वायरने त्याचा गळा आवळून हत्या केली.
दरम्यान आज सकाळच्या सुमारास जेव्हा मृत अनिलकुमारचे इतर मित्र त्याला झोपेतून उठवण्यात आले असता, तो जागेवरून उठला नाही हे पाहताच त्याच्या मित्रांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांचे एक पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत अनिलकुमारचा मृतदेह तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना करून घटनेचा तपास सुरू केला.
अनिल कुमार याचा गळा आवळून खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालात समोर येताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवण्यास सुरुवात केली. प्राथमिक माहिती नुसार, पोलिसांनी चौकशी करत आरोपी हिरालाल याला ताब्यात घेत चौकशी केली. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने अनिल कुमारचा खून केल्याची कबुली दिली. दरम्यान हिरालाल याला अनिलकुमारच्या खून प्रकरणी अटक केल्याची माहिती कल्याण विभागाचे एसीपी कल्याणजी घेटे यांनी दिली असून कोळसेवाडी पोलीस पथक या गुन्हाचा पुढील तपास करत आहे.