Jalna Crime News: दोन चिमुकल्यांसह आईने विहिरीत उडी घेऊन आयुष्य संपवलं; जालन्यातील धक्कादायक घटना
Jalna Crime News: जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील सिद्धेश्वर पिंपळगाव येथे एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Jalna Crime News जालना: जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील सिद्धेश्वर पिंपळगाव येथे एका महिलेने आपल्या दोन चिमुकल्यांसह विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सदर महिलेचा मुलांसह रात्री मृतदेह गावातील नदी जवळील एका विहिरीमध्ये आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
मयत महिलेने आपल्या दोन्ही मुलांना विहिरीत टाकुन त्यानंतर स्वतःही उडी घेतली असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे. सविता खरात असे मयत महिलेचे नाव असून यात 5 वर्षीय भावेश खरात आणि 3 वर्षीय आबा खरात या चिमुकल्यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांकडून पंचनामा सुरू असून कौटुंबिक कलहातून आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
खटाव तालुक्यातील शिरसवडी येथे कॅनॉलमध्ये बुडून चिमुकल्या बहीण-भावाचा मृत्यू
खटाव तालुक्यातील शिरसवडी येथील तळवस्ती येथील उरमोडी कॅनॉलमध्ये बहीण-भावाचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला. यातील पाच वर्षांची बालिकेचा मृतदेह सापडला होता, तर सात वर्षीय मुलाचा उशिरा गोपूज हद्दीतील आरे नावाच्या शिवारात नजिकच्या कॅनॉलमध्ये मृतदेह सापडला. रिया शिवाजी इंगळे, सत्यम उर्फ गणू शिवाजी इंगळे अशी मृत बालकाची नावे आहेत. या घटनेमुळे शिरसवडी गावावर शोककळा पसरली. शिरसवडी येथील शिवाजी नानू इंगळे यांची दोन्ही मुले गोपूजवाडा येथे शिक्षण घेण्यासाठी जात होती, मुलगा सत्यम इयत्ता दुसरीत तर मुलगी अंगणवाडीत होती. शाळा सुटल्यावर मुले अजून घरी नाहीत म्हणून कुटुंबियांनी शोधाशोध केली. त्यानंतर काही वेळाने मुलगी रियाचा मृतदेह कॅनॉलमध्ये आढळून आला. रियाचा मृतदेह सापडल्यानंतर सत्यमला शोधण्यासाठी ग्रामस्थ, पोलिस आणि अधिकाऱ्यांनी शोधमोहीम सुरु होती. काल सत्यमचा मृतदेह आढळून आला. यावेळी शिरसवडी, गोपूज, गुरसाळे आदी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.























