महिलांच्या वेशातील भामट्यांचा चोरीचा प्रयत्न, घरात घुसून मुलीचा गळा दाबला, गावकऱ्यांनी दिला चोप
Jalgaon news update : चोरट्यांनी भरदिवसा एका मुलीचा गळा दाबून घरातून पैसे लुटल्याचा प्रकार पुढे आल्याने जळगावात एकच खळबळ उडाली आहे. तिन्ही बहुरूप्यांना नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.
Jalgaon news update : महिलांच्या वेषात घरात घुसून चोरी करणाऱ्या तिघा बहुरूप्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या चोरट्यांनी भरदिवसा एका मुलीचा गळा दाबून घरातून पैसे लुटल्याचा प्रकार पुढे आल्याने जळगावात एकच खळबळ उडाली आहे. तिन्ही बहुरूप्यांना नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. जळगावातील वाटिका आश्रम परिसरात भरदिवसा ही चोरी झालीय.
साडी परिधान केलेले तीन तरुण रविवारी दहा वाजण्याच्या सुमारास जळगावातील वाटिकाश्रम परिसरात पैसे मागत फिरत होते. एका घरात मुलगी एकटी असल्याची संधी साधत तिघापैकी एकाने मुलीचा गळा दाबून तिला घरातून पैसे आणायला लावले. यावेळी मुलीने आरडा ओरड केली. त्यामुळे तिघेही पळून दुसऱ्या भागात गेले. परंतु, तेथील एका घरात हे तिघे जण घुसले घरातील एकाला पैसे मागितले. त्याने पैसे देण्यासाठी पाकीट हातात घेताच तिघांनी त्याचे पाकिट हुसकावून बळजबरीने त्यातील एक हजार रुपये काढून घेतले. तिघेही दमदाटी करून जबरी लूट करत असल्याचे समोर आल्यानंतर नागरिकांनी त्यांना पकडून बेदम चोप दिला. घटनेची माहिती तालुका पोलिसांना देऊन तिघांनाही पोलिसांच्या स्वाधीन केले.
भरदिवसा घडलेल्या या घटनेने जळगाव एकच खळबळ उडाली असल्याचा पाहायला मिळालं. मुले पकडून पळवून नेणारी असल्याच्या संशयावरूनही या परिसरात गोंधळ उडाला होता. या तिघांना पकडल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी परिसरात एकच गर्दी केली होती. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी कोणीही तक्रारदार समोरून न आल्याने पोलिसांनी अद्याप पर्यंत कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही अशी माहिती मिळाली आहे.
दरम्यान, मुलं चोरीचे अनेक फेक मॅसेज आणि व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या अफवांमुळे अनेक ठिकाणी निर्दोष लोकांना मारहाण झाल्याच्या घटना सुद्धा समोर आल्या आहेत. त्यातच आता जळगावमध्ये ही घटना घडल्यामुळे पोलिसांसमोर आव्हान उभा राहिलं आहे. काही ठिकाणी फक्त अफवांवरून निर्दोष लोकांना मारहाण होत आहे. तर काही ठिकाणी भिक मागण्याचा बहाणा करून चोरी केल्याचे प्रकार समोर येत आहेत.
महत्वाच्या बातम्या