(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सोन्याचे दागिने काढून नकली दागिने परिधान करणं वधूला महागात; चोरट्याकडून नवरीचे सोळा लाखांचे दागिने लंपास
आपल्या लग्नात मॅचिंग बेंटेक्सचे दागिने परिधान करणं वधूला महागात पडलं आहे. अल्पवयीन चोरट्यांनी दागिन्यांच्या बॅगेवर पाळत ठेवून वेळ साधत तब्बल 16 लाखांचे दागिने लंपास केले आहेत.
जळगाव : महागड्या घागऱ्यावर सोन्याच्या दागिन्यांऐवजी बेंटेक्सचे दागिने अधिक उठून दिसतं असल्यामुळे, नवरीने सोन्याचे दागिने काढून त्याऐवजी लग्नात बेंटेक्सचे दागिने घालणं पसंत केलं होतं. मात्र ही चूक वधू आणि तिच्या कुटुंबाला चांगलीच महागात पडली आहे. कारण बेंटेक्सचे दागिने घालण्यापूर्वी वधूने सोन्याचे दागिने काढून ते मावशीजवळ संभाळण्यासाठी दिले होते. पण मावशीची नजर चूकवत एका अल्पवयीन चोरट्याने, दागिन्यांची पर्स लग्नातून लंपास केली. लग्नसोहळ्यातून तब्बल सोळा लाख रुपयांचे दागिने लंपास करण्यात आल्यामुळे मोठी खळबळ उडाली.
जळगाव शहरातील भुसावळ रस्त्यालगत मुंबई नागपूर महामार्गावर असलेल्या कमल पॅराडाईज हॉल येथे काल पार पडलेल्या विवाह समारंभात ही घटना घडल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. रावेर तालुक्यातील उद्योजक आणि शेतकरी युवराज नेमाडे यांच्या दीपाली नावाच्या मुलीचा विवाह जळगाव शहरातील हिमांशू फिरके यांच्यासोबत पार पडला. बदलत्या काळात विवाह समारंभात वर आणि वधू वेगवेगळ्या विधी प्रमाणे आपले कपडे आणि मेकअप बदलतात. हा ट्रेंड सध्या सर्वदूर पाहायला मिळतो. याच पद्धतीने नवरी दीपालीने आपलं लग्न लागल्यानंतर आपल्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून ठेवले. त्यानंतर घागऱ्यावर शोभून दिसणारे नवीन डिझाइनचे बेंटेक्सचे दागिने परिधान केले, यावेळी सोन्याचे दागिने काढून तिने आपल्या मावशीजवळ संभाळण्यासाठी दिले होते. मात्र लग्नाच्या गोंधळात मावशी व्यस्त असल्यामुळे त्यांनी आपल्या बाजूलाच दागिने असलेली पर्स ठेऊन इतर नातेवाईकांशी गप्पा गोष्टी सुरु ठेवल्या होत्या. याच काळात त्यांच्यावर पाळत ठेऊन असलेली दोन अल्पवयीन मुलांनी त्यांच पर्सकडे लक्ष नसल्याची संधी साधत काही सेकंदातच, सोन्याचे दागिने असलेली बॅग लांबविण्यात यश मिळविले, काही वेळानंतर आपल्या बाजूला असलेली सोन्याची बॅग लंपास झाल्याचं लक्षात आल्यावर, नेमाडे परिवाराने मंगल कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरा तपासून पहिला. एक अल्पवयीन मुलगा त्यांची बॅग घेऊन पळून जाताना त्यात आढळून आला. त्याच्यासोबत आणखी एक अल्पवयीन मुलगा आणि एक दाढी वाढलेला इसम देखील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.
चार लाखाचे दागिने घेऊन नवरी दुसऱ्याच दिवशी पळाली, नांदगाव तालुक्यातील घटना
काल घडलेल्या या घटनेच्या संदर्भात जळगाव शहरातील शनीपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आता चोरट्यांचा शोध घेत आहेत. शहरातील कमल पॅराडाईज या मंगल कार्यालयात मागील काळात ही अशा प्रकारच्या घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत चोरट्याने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने रेकी करीत अल्पवयीन मुलाच्या साहाय्याने ही मोठी चोरी केली. या चोरट्यांचा शोध घेणं पोलिसांसाठी मोठं आव्हान ठरलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :