Indapur : इंदापुरात गोळीबार, भर रस्त्यावर तीन राऊंड फायर, एकजण गंभीर जखमी; कायद्याची 'ऐसी की तैसी' सुरूच
Indapur Firing : इंदापूर कॉलेजसमोर भर रस्त्यावर गोळीबाराची घटना घडली असून त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा फज्जा उडाल्याचं स्पष्ट झालंय.
पुणे : बारामतीमधील हत्येची घटना ताजी असतानाच आता इंदापुरात अज्ञाताने एकावर गोळीबार केला आहे. या गोळीबारात एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळतेय. राहुल चव्हाण असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नांव आहे. तो इंदापूर तालुक्यातील शिरसोडी गावचा असल्याची माहिती मिळतेय.
इंदापुरात तीन राऊंड फायर झाले असून त्यामध्ये राहुल चव्हाण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. ही घटना घडताच इंदापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जखमीला तातडीने खाजगी रुग्णालयात उपचार दाखल केलं. एक अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून आली त्याने तीन ते चार राऊंड फायर केले. त्यापैकी तीन राऊंड समोरील व्यक्तीला लागले आणि यात ती व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
भर रस्त्यावर गोळीबार
बारामतीमध्ये एका कॉलेजमध्ये विद्यार्थ्याची कोयत्याने हत्या केल्याची घटना घडल्यानंतर इंदापुरातही गोळीबार झाल्याने सर्वत्र भीतीचं वातावरण आहे. इंदापूरमधील एका महाविद्यालयाच्या समोर सायंकाळी सहा ते साडे सहाच्या दरम्यान ही घटना घडली. या गोळीबारामागचे कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. या घटनेनंतर पुणे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था मात्र वेशीवर टांगत असल्याचं स्पष्ट झालंय.
कॉलेजमध्ये एका विद्यार्थ्याचा खून
बारामतीमध्ये दिवसाढवळ्या तुळजाराम चतुचंद महाविद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्याच्या झालेल्या खुनाने बारामती हादरून गेली आहे. बारामतीमधील प्रसिद्ध अशा तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. एक महिन्यापूर्वी दुचाकीला ‘कट’ मारण्यावरून दोन विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला होता. यानंतर पार्किंगमध्येही त्यांचा वाद झाला होता. त्यानंतर खूनाची ही घटना घडली आहे.
एकाच वर्गामध्ये शिकणाऱ्या दुसऱ्या विद्यार्थ्याने हा खून केला आहे. या दोन विद्यार्थ्यामध्ये कडाक्याचे भांडण झालं होतं आणि भांडणाचं रूपांतर खून होण्यापर्यंत गेल्याची माहिती समोर आली आहे. हल्ला करण्यात आला तेव्हा दोघेजण होते. यामधील एक जण पळून गेला असून एक जण पोलिसांना सापडला आहे.
ही बातमी वाचा: