Gondia News : वैद्यकीय अधिकाऱ्याला लाच घेणं भोवलं; लाच मागणारा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
Gondia News: गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव येथील एका वैद्यकीय अधिकाऱ्याला लाच घेणं चांगलेच भोवलं आहे. या प्रकरणी लाचलुचपत विभागाने लाच मागणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला ताब्यात घेतले आहे.
Gondia News गोंदिया : गोंदियाच्या (Gondia Crime) अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव येथील एका वैद्यकीय अधिकाऱ्याला लाच घेणं चांगलेच भोवलं आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत कनिष्ठ सहाय्यकाच्या थकीत भत्याच्या बिलावर स्वाक्षरी करण्यासाठी प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्याने लाच मागितली. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची (Anti Corruption Buero) या प्रकरणाची साहनिशा केली असता यात 48 हजार रूपयाची लाच स्वाकारण्याची तयारी दर्शविली. यामुळे लाचलुचपत विभागाने लाच मागणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला ताब्यात घेतले. डॉ. अंबर मडावी (वय 44) असे या संशयित आरोपीचे नाव आहे. तर तक्रारकर्ता अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कनिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत आहे.
तक्रारदाराचे बिल काढून देण्यासाठी मागितली 10 टक्के लाच
या प्रकरणी तक्रारकर्त्याचे नक्षलभत्ता आणि अतिरिक्त घरभाडे फरकाचे 6 लाख 7 हजार 320 रुपयांचे बिल तयार करण्यात आले. बाराभाटी येथील आयुर्वेदिक दवाखान्यात कार्यरत डॉ. अंबर मडावी यांच्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव येथील अतिरिक्त कार्यभार आहे. त्यामुळे तक्रारकर्त्यांचा बिलावर सही करण्यासाठी डॉ.अंबर यांनी 10 टक्के प्रमाणे 60 हजार रूपये लाचेची मागणी केली. तक्रारकर्त्याला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत विभाग गोंदियाकडे तक्रार केली. तक्रारीची सहनिशा करून लाचलुचपत विभागाने डॉ.अंबर मडावी याला ताब्यात घेवून अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यात लाचलुचपत कायद्यान्वये गुन्हा करण्यात आला आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
शॉर्ट सर्किटनं दोन दुकानांसह दोन चारचाकी वाहन जळून खाक
दुकानांमध्ये शॉर्ट सर्किटमुळं लागलेल्या आगीत हार्डवेअर आणि एंटरप्राइजेस अशी दोन दुकानं जळून खाक झालीय. या आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणात असल्यानं या दुकानांसमोर उभ्या असलेल्या दोन चारचाकी वाहनं ही पूर्णतः जाळून खाक झालीत. ही घटना भंडारा राष्ट्रीय महामार्गावरील शहापूर इथं घडली. या आगीत दोन्ही दुकान आणि दोन वाहनं जळाल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झालंय.
शेत खरेदीमध्ये गंडा घालणाऱ्या नऊ जणांच्या टोळीला अटक
अमरावतीच्या मंगरूळ चव्हाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका 40 वर्षिय महिलेची शेत खरेदी विक्री व्यवहारात तब्बल 74 लाखांनी फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी अमरावती ग्रामीण पोलिसांच्या सायबर विभागाने मुंबईतील जोगेश्वरी भागातून एका हॉटेलमधून नऊ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून रोख, मोबाईल आणि अन्यसामग्री जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. अटक करण्यात आलेले 9 आरोपी हे हरियाणा, आसाम, राजस्थान, उत्तर प्रदेश, जोगेश्वरी पश्चिम मुंबई आणि नागपूर येथील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून 74 लाखांपैकी 40 लाख रुपये सायबर पोलिसांनी गोठविले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या