Gondia Crime News : घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; 11 तलवारीसह एक जण जेरबंद
Gondia Crime News : गोंदिया जिल्ह्यातील फत्तेपूर येथील एका घरावर छापा टाकून चक्क 11 छुप्या तलवारी जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाला यश आलं आहे.
Gondia News : गोंदिया जिल्ह्यातील फत्तेपूर येथील एका घरावर छापा टाकून चक्क 11 छुप्या तलवारी (Swords) जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाला (Gondia Police) यश आले आहे. गंगाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फत्तेपूर गावात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने 20 फेब्रुवारीच्या दुपारी ही कारवाई केली. विशेष म्हणजे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांनी निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस पथकाला सूचना दिल्या होत्या. या सूचनेनुसार पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली आहे. या प्रकरणी बादल खोब्रागडे (27) याच्या घरातून चक्क 11 तलवारी (Gondia Crime News) पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.
घरात लपवून ठेवल्या चक्क 11 तलवारी
गोंदिया जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि कायदा-सुव्यवस्था संबंधित पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. सोबतच आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने जिल्ह्यात दहशत मांजवणाऱ्या आणि गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारांच्या विरुद्ध पोलिसांनी आपला मोर्चा वळवला आहे. जिल्ह्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांचा शोध घेऊन त्यांच्याकडील अवैधरित्या शस्त्रे, हत्यार बाळगणाऱ्या गुन्हेगारांची माहिती काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना गोंदिया पोलिसांच्या वरिष्ठांनी दिल्या होत्या. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने तपासाचे चक्र गतिमान करत तपास सुरू केला असता, पोलिसांना एका युवकाजवळ अवैध शस्त्रांचा मोठा साठा असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली. या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी गंगाझरी हद्दीतील मौजा-फत्तेपूर येथे राहणाऱ्या बादल खोब्रागडे या तरुणाच्या घरी अचानक धाड टाकली. त्यानंतर पोलिसांना घरझडतीत घेतली असता, पोलिसांना घरातील स्वयंपाक खोलीतील एका कोपऱ्यात प्लास्टिक बोरीत लपवून ठेवलेल्या 11 लोखंडी तलवारी आणि लोखंडी पाता असलेल्या अवैध शस्त्र ज्याची किंमती अंदाजे 11 हजार रुपय या आढळून आल्या.
दोघांविरुद्ध गुन्हा दखल
या प्रकरणी पोलिसांनी बादल खोब्रागडे याला विनापरवाना बेकायदेशीर रित्या धारदार शस्त्र बाळगल्या प्रकरणी त्यास मुद्देमालासह ताब्यात घेतले. पोलिसांनी या प्रकरणी बादलची विचारपूस केली असता, त्याने हे शस्त्र त्याचा आत्तेभाऊ असलेल्या गौतम उर्फ निगम उर्फ गामा संजय वाहाणे, (रा. वाजपेयी वॉर्ड, गोंदिया) याची असल्याची सांगून आपण ते घरी आणून ठेवल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर देखील गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गंगाझरी पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक- 58/2024 कलम 4, 25 भारतीय हत्यार कायदा, सहकलम 37 (1), (3), मुंबई पोलीस अधिनियम सन 1951, कलम 135 म.पो.का. अन्वये मपोउपनि- सायकर, स्थानिक गुन्हे शाखा, यांचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सोबतच इतक्या मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्र बाळगण्यामागील नेमका उद्देश काय याचा तपास सध्या पोलीस करत आहे.