'मुलीसाठी आईचा गर्भ किंवा कबरच सुरक्षित', आत्महत्येपूर्वी 11 वीतील मुलीचं मन हेलावून टाकणारं पत्र
तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये एका अल्पवयीन मुलीने लैगिंक अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केली असून तिने लिहिलेलं आत्महत्या पत्र मन हेलावून टाकणारं आहे.
चेन्नई : तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. चेन्नईत इयत्ता 11 वीमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने लैंगिक अत्याचाराला कंटाळून स्वत:चा जीव दिला आहे. पण तिने आत्महत्या करताना लिहिलेल्या सुसाईड नोटमधील मजकूर मन हेलावून टाकणारा आहे. 11 व्या इयत्तेतील मुलीने तिच्या सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे की,'मुलगी ही केवळ आईच्या गर्भात किंवा मृत्यूनंतर कबरमध्येच सुरक्षित आहे.’ दरम्यान या नोटमधील मजकूरामुळे संबधित मुलीने जीवंतपणी किती हाल सोसले आहेत, याची केवळ कल्पना करता येऊ शकते. विशेष म्हणजे तिच्या कुटुंबालाही याबद्दल माहिती नसल्याचं समोर आलं आहे. शनिवारी त्या मुलीची आई बाजारातून घरी परतली असता तिने मुलीला मृत अवस्थेत पाहिले. तिने बंद खोलीमध्ये आत्महत्या करत स्वत:चं जीवन संपवलं होतं.
तिच्या खोलीत मिळालेल्या सुसाइड नोटमध्ये तिने लिहिलं होतं की, 'शाळा ही सुरक्षित नाहीत आणि टीचर्सवरही भरोसा केला जाऊ शकत नाही. तसंच या मानसिक त्रासामुळे अभ्यास होत नसून झोपही लागत नव्हती.' तिने पुढे लिहिलं आहे की, ‘लैंगिक अत्याचार बंद करा' आणि शेवटी ‘मला न्याय द्या’ असं लिहित तिने आत्महत्या केली आहे. तसंच पत्रात तिने 'प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलाला मुलीचा सन्मान करायला शिकवावा' असही लिहिलं आहे.
पोलिसांकडून कारवाईला सुरुवात
याप्रकरणी पोलिसांनी एका 21 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याला अटक केली आहे. त्याच्यावर पॉक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. पोलिसांच्या मते संबधित मुलाने त्याचा गुन्हा कबूलही केला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'मुलाने संबधित मुलीबरोबर शारीरिक संबध बनवल्याची कबूली दिली आहे. मागील काही काळांपासून हा त्रास सुरु असून याआधी आठ महिने दोघांमध्ये चांगली मैत्री होती. दरम्यान सुसाईड नोटनुसार संबधित मुलीवर आणखी नराधमांनी अत्याचारतर केलेला नाही ना? याबाबत पोलीस तपास करत आहेत.'
हे ही वाचा :
- Cyber Crime : सायबर गुन्हेगारांना वेबसाईट बनवून देणाऱ्याला अटक, माटुंगा पोलिसांची कारवाई
- वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून कर्मचाऱ्याची आत्महत्या, जळगावमधील खळबळजनक घटना
- अंबाजोगाई: अल्पवयीन मुलीवर क्रौर्याची परिसीमा; दारू पाजून पोलिसांनी केले अत्याचार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha