Gadchiroli : कुंपनानेच शेत खाल्लं! फॉरेस्टच्या कर्मचाऱ्यांनीच हरणाची शिकार केली, मटण शिजवत असताना रंगेहात अटक
Gadchiroli Crime : गडचिरोलीतील नागेपल्ली कर्चाऱ्यांच्या कॉलनीत या आधीही हरणाचे मटण शिजल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. या प्रकरणाचा तपास झाल्यानंतर आधीच्या घटनाही समोर येण्याची शक्यता आहे.

गडचिरोली : आलापल्ली वनविभागातून वन्यजीव रक्षणाच्या बाबतीत गंभीर निष्काळजीपणाची घटना समोर आली आहे. नागेपल्ली येथील वनविकास महामंडळाच्या कॉलनीत दोन वन कर्मचाऱ्यांनी हरणाची शिकार केली आणि त्याचे मांस स्वतःच्या घरी शिजवत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या दोनही कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
हरणाची शिकार झाल्याची माहिती मिळताच उपवनसंरक्षक दीपाली तलमले यांनी तत्काळ कारवाई केली. गुरुवारी रात्री आठच्या सुमारास अहेरी वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्यांसह त्यांनी कॉलनीत धाड टाकली. या कारवाईत दोन कर्मचाऱ्यांना हरणाचे मांस शिजवत असताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडील मांस जप्त करण्यात आले आहे. सध्या त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे.
कारवाईमुळे खळबळ
दीपाली तलमले यांनी काही दिवसांपूर्वीच उपवनसंरक्षक म्हणून कार्यभार स्वीकारला. त्यांनी केलेल्या या पहिल्याच मोठ्या कारवाईमुळे वनविभागात खळबळ उडाली आहे.
सदर प्रकरणात इतर अधिकारी किंवा कर्मचारी सहभागी होते का, याचाही तपास केला जात आहे. या कर्मचाऱ्यांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर अधिक माहिती स्पष्ट होणार आहे, असे दीपाली तलमले यांनी सांगितले.
या आधीही हरणाची शिकार?
या आधीही हरणांची शिकार करुन वनविकास महामंडळाच्या कॉलनीत त्याचे मटण शिजवण्यात आल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. त्याचीही माहिती घेतली जात आहे. त्यामुळे अटक करण्यात आलेल्या दोन कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर किती कर्मचारी वन्य प्राण्यांच्या शिकारीमध्ये सहभागी आहेत याची माहिती समोर येणार आहे.
आलापल्ली परिसरात घनदाट जंगल असून या ठिकाणी विविध वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. अशा ठिकाणीच हरणाची शिकार करण्यात आल्याने वन्यजीव सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. तसेच ज्या वनविभागावर प्राण्यांची सुरक्षा असते त्यांनीच हरणांची शिकार केल्याने खळबळ माजली आहे.
नीलगाईचे अवयव सापडले
दुसऱ्या एका घटनेत, दोन इसमांकडे नीलगाईचे अवयव सापडले आहेत. आष्टी ते आलापल्ली या राष्ट्रीय महामार्गावर एका दुचाकीवर दोन इसम काहीतरी बांधून संशयास्पद प्रवास करत होते. पोलिसांना शंका येतात त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आपल्या जवळील पोते रस्त्यावर फेकून पसार झाले. नंतर पोलिसांनी ते पोते उघडून बघितले असता त्यात नीलगाईचे काही अवयव आढळून आले. त्यांनी याची माहिती वनविभागाला देताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करून अवयव फॉरेन्सिक लॅबला पाठवले आहेत.
ही बातमी वाचा:























