28 हजारांची लाच घेताना पकडलं,पाटबंधारे खात्याच्या इंजिनिअरकडे दोन किलो सोन्यासह 1.61 कोटीचं घबाड सापडलं!
Beed PWD Engineer Bribe Case : 28 हजारांची लाच घेताना पकडलेल्या PWD विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे दोन किलो सोन्यासह 1.61 कोटीचं घबाड सापडलं आहे.
बीड : लाच घेताना (Bribe) रंगेहाथ पकडलेल्या कार्यकारी अभियंत्याकडे 1 कोटी 61 रुपयांचं घबाड सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर यांच्या लॉकरमध्ये तब्बल एक कोटी 61 लाख रुपयांचे ऐवज सापडला आहे. सलगरकर यांच्या परळीतील राहत्या घरातून 21 लाख रुपयाचे ऐवज सापडल्यानंतर सांगलीमध्ये बँकेतील लॉकरमध्ये तब्बल एक कोटी 61 लाख रुपयांचे ऐवज पोलिसांच्या हाती लागले आहेत.
लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहाथ अटक
माजलगावच्या पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता राजेश आनंदराव सलगरकर याला 28 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते. शुक्रवारी त्याच्या सांगलीमधील युनियन बँक ऑफ इंडियाच्या लॉकरमध्ये तपासणी केली असता सोन्याचे बिस्किट, रोख रक्कम असे मिळून तब्बल एक कोटी 61 लाख रुपयांचा ऐवज पोलिसांना सापडला आहे.
सुरुवातीला 35 हजारांची मागणी, 28 हजार घेताना अटक
चिंचोटी तलावातील बुडीत क्षेत्रातील गाळ आणि माती काढून शेतात टाकण्यासाठी परवानगी मिळण्यासाठी कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग येथे तक्रारदाराने अर्ज दिला होता. सदर अर्जावरून मौजे चिंचोटी तलावातील बुडीत क्षेत्रातील गाळ आणि माती काढून शेतात टाकण्यासाठी परवानगी देण्यासाठी प्रत्येकी 5 हजार प्रमाणे सात जणांचे 35 हजारांची मागणी करून तडजोडअंती प्रत्येकी 4 हजार प्रमाणे प्रत्येकी 7 जणांकडून 28 हजारांची मागणी करत सलगरकर याने ही लाच स्वीकारली होती. त्याला रंगेहात पकडल्यानंतर त्याच्यावर परळी शहर पोळीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
बँकेच्या लॉकरमध्ये 1.61 कोटीचं घबाड
राजेश सलगरकर याचे सांगली येथील युनियन बँक ऑफ इंडियामध्ये लॉकर होते, हे लॉकर शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक प्रतिबंधक विभागाकडून तपासण्यात आले. या लॉकरमधील रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे बिस्किट पोलिसांना आढळून आले आहेत.
बँकेच्या लॉकरमध्ये सापडलेला ऐवज
1) रोख रक्कम : 11 लाख 89000 रुपये
2) सोने : एकूण 2 किलो 105 ग्रॅम ज्यामधे (1114 ग्रॅम वजनाचे 7 बिस्कीटे आणि 991 ग्रॅम वजनाचे सोन्याची दागिने) किंमत अंदाजे 1 कोटी 50 लाख
असा एकूण 1 कोटी 61 लाख 89 हजार रुपयाचा ऐवज सापडला आहे.
चार दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर जामीन
पाटबंधारे अभियंता (PWD Engineer) राजेश सलगरकर याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर चार दिवसाची पोलीस कोठडी (Police Custody) झाली होती, मात्र आता तो जामीनावर (Bail) बाहेर आहे. विशेष म्हणजे शुक्रवारी सांगली येथील युनियन बँक ऑफ इंडियामधील लॉकरची त्याच्या समक्ष तपासणी झाली. या लॉकरमध्ये एक कोटी 61 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना सापडला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :