Patra Chawl Case : संजय राऊतांच्या निकटवर्तीयांवर ईडीची कारवाई, 73.62 कोटीची मालमत्ता जप्त
Sanjay Raut News : संजय राऊतांच्या निकटवर्तीयांवर ईडीने कारवाई करत त्यांची 73.62 कोटीची मालमत्ता जप्त केली आहे.
मुंबई : शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या निकटवर्तीयांवर ईडी कारवाईचा (ED Action) फास आवळला आहे. अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) म्हणजेच ईडीने (ED) कारवाई करत प्रवीण राऊत (Pravin Raut) याची मालमत्ता जप्त (Property Seized) केली आहे. पत्राचाळ पुनर्विकास घोटाळा (Patra Chawl Case) प्रकरणी ईडीने प्रवीण राऊतांची मालमत्ता जप्त (Pravin Raut Property Seized by ED) केली आहे. ईडीने पत्राचाळ कथित मनी लॉड्रिंग (Money laundering) प्रकरणात ही कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून एफआयआर (FIR) दाखल केल्यानंतर ईडीने ही कारवाई केली आहे.
संजय राऊतांच्या निकटवर्तीयांवर ईडीची कारवाई
ईडीने प्रवीण राऊत यांच्यासह इतर भगीदारांची पालघर, दापोली, रायगड आणि ठाणे येथील मालमत्ता ईडीकडून जप्त केली आहे. ईडीने (ED) 73.62 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात 116.27 कोटी रूपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. पीएमएलए कायदा 2002 च्या तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आल्याचं ईडीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
गुन्हे शाखेच्या एफआयआरनंतर कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, पालघर, दापोली, रायगड आणि ठाणे परिसरात स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली आहेत. पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत आणि प्रवीण राऊत या दोघांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) एफआयआर नोंदवल्यानंतर आता मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. पत्राचाळ पुनर्विकासकाच्या नावाखाली अनेक बेकायदेशीर कामे करण्यात आल्याची माहिती ईडीने दिली आहे. सोसायटी, म्हाडा आणि जीएसीपीएल यांच्यात त्रिपक्षीय करार झाला. करारानुसार 672 भाडेकरूंना सदनिका देण्यात येणार होत्या.
ईडीने कारवाईबाबत काय म्हटलंय?
पत्राचाळ घोटाळ्यातून मिळालेल्या रकमेचा काही भाग प्रवीण राऊत यांना देण्यात आल्याचं ईडीने सांगितलं आहे. GACPL संचालकांनी म्हाडाची दिशाभूल करून 672 विस्थापित भाडेकरूंचे पुनर्वसन आणि म्हाडासाठी सदनिकांचे बांधकाम न करता 901.79 कोटी रुपये गोळा केले. GACPL संचालक प्रवीण राऊत यांनी 95 कोटी रुपयांच्या गुन्ह्यातील रक्कम त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यांमध्ये वळती केली होती. आर्थिक व्यवहारातील कमाईचा काही भाग त्यांनी संबंधित व्यक्तींकडे ठेवला होता, तर प्रवीण राऊत यांनी मिळवलेल्या काही मालमत्ता नंतर त्याच्या कुटुंबीयांना भेट म्हणून देण्यात आल्या होत्या. मार्च 2022 मध्ये या प्रकरणी ईडीने आरोपपत्रही दाखल केले होतं.