(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कारखान्यावरील मुकादमाचं अपहरण करुन 12 लाखांची मागणी, पैसे न दिल्याने खून; बीडमधील धक्कादायक घटना
Beed : पैसे न दिल्यास जीवे मारू अशी धमकी अपहरणकर्त्यांनी दिली होती. ती आता खरी झाल्याचं स्पष्ट झालंय.
बीड : पैशाच्या आर्थिक व्यवहारातून एका साखर कारखान्यावरील मजूर पुरवठादार अधिकार्याचे अपहरण झाल्याची घटना बीडच्या केजमध्ये घडली होती. या मजूर पुरवठा अधिकाऱ्याला कर्नाटक राज्यातील संकेश्वर साखर कारखान्यावर डांबून ठेवल्या प्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. आता त्या मुकादमाचा खून झाला असल्याचं स्पष्ट झालंय.
केज तालुक्यातील लव्हुरी येथील सुधाकर चाळक यांचे वडवणी येथील एका हॉटेलमधून अपहरण करून त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली. त्यांची सुटका करण्यासाठी 12 लाख रुपयांची मागणी केली जात होती. त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावर जर पैसे आणून दिले नाहीत तर जीवे मारण्याची फोनवरून धमकी दिली होती.
अपहरणकर्त्यांनी कट रचून अत्यंत निर्दयीपणे नियोजनपूर्वक सुधाकर चाळक याचे शीर धडावेगळे करून खून केला आणि पुरावा नष्ट करण्याचा उद्देशाने शीर नसलेले धड हिरण्यकेशी नदीत फेकले. तर तेथून पुढे 10 किमी अंतरावर शीर फेकून विल्हेवाट लावली. त्याचा केज पोलिसांचे पथक ते शिराचा तपास घेत आहे.
असे घडले अपहरणनाट्य
केज तालुक्यातील लव्हुरी येथील सुधाकर उर्फ सुदाम चाळक हे महालक्ष्मी साखर कारखाना येथे मजूर पुरवठा अधिकारी म्हणून काम करीत आहेत. त्यांचे 16 फेब्रुवारी रोजी वडवणी येथून काही अज्ञात लोकांनी अपहरण केले आहे. त्यामुळे 25 तारखेला त्यांच्या नातेवाईकांनी चाळक बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, 27 तारखेला त्यांचा भाऊ व मुले यांना चाळक यांच्या फोनवरून अज्ञात लोकांनी फोन केला. अपहरणकर्ते हे सुधाकर उर्फ सुदाम चाळक यांच्या सुटकेसाठी 12 लाख रुपयांची मागणी करीत आहेत. तसेच त्यांना अमानुष मारहाण करीत असल्याचा कॉल रेकॉर्डिंगचा आवाज ऐकू येत असून सुधाकर चाळक यांना वेदना होत असल्याचे त्या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येत होतं. अपहरणकर्त्याला त्यांचा मुलगा हा मारहाण न करण्याची विंनती करीत होते. तरी देखील ते अमानुष व बेदम मारहाण करीत असल्याचा आहेत.
अपहरणकर्ते हे हिंदी भाषेत बोलत होते आणि शिवीगाळ करीत होते. सुटकेसाठी ते कर्नाटक येथील संकेश्वर साखर कारखान्यावर पैसे घेऊन येण्याची मागणी करत होते. जर पैसे आणून दिले नाहीत तर जीवे मारू अशी धमकी फोनवरून दिली होते.
अक्षय चाळक याने त्याचे वडील सुधाकर चाळक यांचे अज्ञात अपहरणकर्त्यांनी अपहरण करू मारहाण करून पैशासाठी जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
असा झाला उलगडा..
या सर्व प्रकाराची माहितीची व कॉल रेकार्डच्या सीडीआरवरून सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी संशयित आरोपी तुकाराम मुंडे, चारदरी ता धारूर जि बीड, रमेश मुंडे रा. कोठरबन ता वडवणी जि. बीड दत्तात्रय हिंदुराव देसाई (वय 58 वर्ष) रा. कडगाव ता. भुदरगड जि कोल्हापूर यांना ताब्यात घेऊन तपास सुरू केला
आरोपी दत्तात्रय हिंदुराव देसाई रा. कडगाव ता. भुदरगड याने पोलिसांना चौकशी दरम्यान सांगितले की, त्यांनी सुधाकर चाळक यांचा खून करून त्याचे मुंडके धडावेगळे करून पुरावा नष्ट करण्यासाठी ते धड पोत्यात बांधून कोल्हापूर जिल्ह्यातील नांगनूरजवळ हिरण्यकेशी नदीत फेकलं आणि शीर तिथून पुढे 10 किमी अंतरावर पाण्यात फेकले आहे.
संशयितांना घेऊन पोलीस नांगनूरच्या हिरण्यकेशी पुलावर सोमवारी दाखल झाले. त्यांनी गडहिंग्लजच्या पास रेस्क्यू टीमला घेऊन मृतदेहाचा शोध घेतला. सायंकाळी नदीपात्रात मृतदेह सापडला आहे. मात्र अद्याप त्या शिराचा तपास लागलेला नाही.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha