Crime News : मैदानाऐवजी गुन्हेगारी विश्वाकडे वळला क्रिकेटपटू; हॉटेल ताज महल पॅलेससह ऋषभ पंतला गंडा घालणारा अटकेत
Mrinank singh Arrested : या क्रिकेटरवर दिल्लीच्या ताज पॅलेस हॉटेलची 5 लाख 53 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आरोपीने स्वत:ला कर्नाटकचा वरिष्ठ आयपीएस अधिकारी म्हणून ओळख सांगितली होती.

Crime News : क्रिकेटच्या ग्राउंडवर करिअरची इनिंग खेळण्याऐवजी गुन्हेगारीला होम ग्राउंड करणाऱ्या आरोपीला दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) अटक केली आहे. मूळचा हरयाणाचा असलेला आणि 19 वर्षाखालील संघाकडून खेळणारा माजी क्रिकेटपटू मृणांक सिंह (Mrinank Singh) याला पोलिसांनी अटक केली आहे. मृणांक सिंगवर फसवणुकीचा आरोप आहे. या क्रिकेटरवर दिल्लीच्या ताज पॅलेस हॉटेलची 5 लाख 53 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आरोपीने स्वत:ला कर्नाटकचा वरिष्ठ आयपीएस अधिकारी म्हणून ओळख सांगितली होती. इतकंच नाही तर त्याने स्वत: ला मुंबई इंडियन्स संघाचा सदस्य असल्याचे सांगितले होते. मृणांकने टीम इंडियाचा खेळाडू ऋषभ पंतची फसवणूक केली आहे.
कशी केली फसवणूक?
दिल्ली पोलिसांनी सांगितले की, ठग मृणाक सिंग हा हरियाणाचा रहिवासी असून तो 19 वर्षाखालील क्रिकेट संघात होता. त्यानंतर लोकांची फसवणूक करण्यास सुरुवात केली. वर्ष 2022 मध्ये दिल्लीतील ताज पॅलेस हॉटेलची 5,53,000 रुपयांची फसवणूक केली. तेथे त्याने एक खोली घेतली आणि स्वतःची ओळख कर्नाटकातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी म्हणून दिली.
ऋषभ पंतही अडकला फसवणुकीच्या जाळ्यात
ठग मृणांक इथेच थांबला नाही. तो स्वत:ला मुंबई इंडियन्स संघाचा खेळाडूही म्हणत होता. मृणांकने भारतातील अनेक लक्झरी हॉटेल्सच्या मालकांना आणि व्यवस्थापकांना अशाच प्रकारच्या मोठ्या बोगस ओळखी दाखवून फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे.
मृणांकने टीम इंडिया खेळाडू ऋषभ पंतचीदेखील फसवणूक केली. दोन वर्षांपूर्वी ऋषभने त्याच्याविरोधात 1.6 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. ठग मृणांक सिंगने ऋषभ पंतला आलिशान घड्याळे स्वस्तात मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. मृणांकने बाऊन्स झालेल्या चेकद्वारे पंतची फसवणूक केली होती. आपण लक्झरी घड्याळे, बॅग, दागिने इत्यादींचा व्यवसाय सुरू केला असल्याचे सिंग याने पंतला सांगितले होते. त्यावर विश्वास ठेवून ऋषभने त्याला काही रक्कम दिली होती. त्यानंतर त्याने ऋषभला वस्तू दिल्याच नाही. त्यानंतर सिंग विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली.
मोबाईलमध्ये आक्षेपार्ह फोटो आढळले
आरोपी मृणांकने हॉटेल, बार, रेस्टॉरंट, तरुणी, कॅब चालक, खाद्यपदार्थांची छोटी दुकाने यांसह अनेकांची त्याने फसवणूक केली आहे. त्याच्या मोबाईलच्या प्राथमिक तपासात त्याची तरुण महिला मॉडेल आणि मुलींशी ओळख असल्याचे समोर आले आहे. त्याच्या मोबाईलमध्ये अनेक व्हिडीओ आणि फोटो सापडले असून त्यातील काही अत्यंत आक्षेपार्ह आहेत.
परदेशात नोकरी करत असल्याचे नातेवाईकांना भासवले
पोलिसांनी सांगितले की, आरोपीचा फोन स्विच ऑफ असायचा. त्याने बहुतांशी वेळा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा इंटरनेट चॅट अॅपच्या माध्यमातून तो नातेवाईक-मित्रांच्या संपर्कात असायचा. तो भारतात नसून आता दुबईत स्थायिक झाला आहे, असा विश्वास त्याच्या ओळखीच्या लोकांना दिला गेला. यानंतर न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आणि त्याने देश सोडून पळून जाण्याचा किंवा गुप्तपणे भारतात स्थलांतरित होण्याचा प्रयत्न केल्यास त्याला अटक करण्यासाठी लुक आउट परिपत्रकही जारी केले.
25 डिसेंबर 2023 रोजी आरोपीला दिल्लीच्या IGI विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. तो हाँगकाँगला जाण्याचा प्रयत्न करत होता. यानंतर त्याला चाणक्यपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
