(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Crime News : दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला अटक; एक आरोपी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी!
Crime News : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या काही आरोपींना उल्हासनगर पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याचाही समावेश आहे.
Crime News : उल्हासनगर शहरात दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या सहा जणांना उल्हासनगर एक नंबर पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपींमधील एकजण हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी असल्याची माहिती आहे. पोलिसांनी आरोपींकडून तलवारी, कोयते, लोखंडी रॉड, मिरची पूड ताब्यात घेतली आहे.
उल्हासनगरमध्ये हे सहाजण दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात होते. अटक करण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचे नाव सुधीर सिंह असे आहे. कॅम्प नंबर २ च्या हनुमान टेकडी परिसरात सायंकाळच्या सुमारास दुचाकी आणि रिक्षा घेऊन सुधीर सिंग आणि दहा ते बारा जणांचे टोळके पप्या शिंदेवर हल्ला करून त्याच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकण्यासाठी निघाले होते. सुधीर सिंग आणि पप्या यांच्यात पूर्ववैमनस्य आहे, यातूनच हा हल्ला केला जाणार होता. या हल्ल्याची गुप्त माहिती उल्हासनगर पोलिसांना मिळाली.
या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. त्यानुसार तात्काळ पोलिसांनी दोन पथकं तयार करून सापळा रचून दुचाकी आणि रिक्षा मधील दोघांना ताब्यात घेतले. रिक्षाची तपासणी केली असता त्यात तलवारी, कोयते लोखंडी रॉड आणि मिरचीची पूड असे दरोड्याचे साहित्य आढळून आले. दरम्यान याप्रकरणी या दोघांना ताब्यात घेऊन आधीच चौकशी केली असता आणखी चार जणांना पोलिसांनी अटक केली. इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
या आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी दोन पथके तयार करुन ती रवाना देखील गेली आहेत. मात्र या दरोड्याच्या प्रयत्नात राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असल्याची चर्चा पसरल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे .दरम्यान अटक केलेले सर्व आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत अशी माहिती उल्हासनगर पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली.