Raigad News : रायगड हादरलं! कोलाड रेल्वे फाटकावर भरदुपारी गोळीबार, सुरक्षा रक्षक जागीच ठार
Raigad Crime News : कोलाडजवळील तिसे रेल्वे फाटकाजवळ झालेल्या गोळीबारात सुरक्षा रक्षकांचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली.
कोलाड, रायगड : कोलाड येथील तिसे रेल्वे फाटकावर (Tise Railway Station) सोमवारी दुपारी गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली. रेल्वे फाटकावर सुरक्षा रक्षक म्हणून कामावर असलेले स्थानिक चंद्रकांत कांबळे यांच्यावर अज्ञात इसमाने गोळीबार केला. कपाळाला गोळी लागल्याने चंद्रकांत कांबळे अक्षरशः रक्ताच्या थारोळ्यात पडले,त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. चंद्रकांत कांबळे यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार करून पोबारा केला. या अनपेक्षित घटनेने संबंध जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. दरम्यान, रेल्वे सुरक्षा रक्षक चंद्रकांत कांबळे यांची गोळीबार करून हत्या का करण्यात आली, याचा अंदाज अजून बांधता आलेला नाही, त्याबाबत तपास सुरू केला असल्याचे कोलाड पोलीस ठाण्याचे (Kolad Police Station) सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबळे यांनी सांगितले.
चंद्रकांत कांबळे हे आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते होते. कोकण रेल्वे संघटनेवर पदाधिकारी होते. रेल्वे संघटनेच्या अंतर्गत वादातून गोळीबार झाला असावा का, त्या अनुषंगानेदेखील सखोल चौकशी करावी अशी मागणी तिसे ग्रामपंचायतचे सरपंच राकेश कांबळे यांनी केली आहे.
कोलाड रेल्वे फाटकावर सोमवारी दुपारी गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. रेल्वे फाटकावर गेटमन म्हणून कामावर असलेले पाले बुद्रुक येथील चंद्रकांत कांबळे हे दुपारी जेवण करत होते. त्याचवेळी अज्ञात इसमाने समोरून चंद्रकांत कांबळे यांच्यावर गोळी झाडली. हल्लेखोराने झाडलेली गोळी थेट कपाळावर लागल्याने चंद्रकांत कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला. गोळीबार करणारा अज्ञात हल्लेखोर फरार झाला. गोळीबाराचे वृत्त कळताच कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, कांबळे कुटुंब, ग्रामस्थांना मोठा धक्का बसला. गोळीबाराच्या अनपेक्षित प्रकाराने रोहा, कोलाडसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
चंद्रकांत कांबळे यांच्यावर गोळी झाडली, त्यावेळी घटनास्थळी कोणी कसे नव्हते, असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे. या घटनेनंतर परिसरातील वातावरण चांगलेच तंग आहे. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते चंद्रकांत कांबळे यांची अशी हत्या व्हावी, हे सर्व धक्कादायक, तेवढेच निषेधार्थ आहे. आम्हाला मोठा धक्का बसला आहे. चंद्रकांत कांबळे यांच्यावर जवळून गोळीबार कोणी केला, याचा तातडीने छडा लागावा, अशी मागणी सरपंच राकेश कांबळे आणि आंबेडकरी समाजाने केली आहे. रेल्वे संघटनेत चंद्रकांत कांबळे यांचे मोठे काम आहे. ते रेल्वे संघटनेचे मोठे पदाधिकारी आहेत. त्याच अंतर्गत वादातून हत्या झाली असावी का अशी चर्चा सुरू आहे. चंद्रकांत कांबळे यांच्यावर गोळीबार का करण्यात आला, याचा तपास आम्ही जलदगतीने करणार आहोत. सर्व घटनेची नोंद घेणे सुरू आहे, अशी प्रतिक्रिया सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबळे यांनी दिली.