Chhatrapati Sambhajinagar Crime: शाळेत मधल्या सुट्टीत धक्का लागला, विद्यार्थ्याने पॉकेट चाकूने वर्गातच चौघांवर वार केले, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवगाव रंगारी येथील शाळेतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime: शाळेत होणाऱ्या क्षुल्लक वादातून थेट रक्तरंजित थरार घडल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील देवगाव रंगारी (Devgaon Rangari) येथे समोर आली आहे. शाळेतील मधल्या सुट्टीत हात धुण्यासाठी रांगेत उभे असताना लागलेल्या एका क्षुल्लक धक्क्यावरून वाद उफाळला. या रागाच्या भरात एका अल्पवयीन विद्यार्थ्याने थेट पॉकेट चाकूने आपल्याच वर्गमित्रांवर सपासप वार करून चार जणांना गंभीर जखमी केले. गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसर आणि शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
Chhatrapati Sambhajinagar Crime: धक्का लागला अन् "थांबा, तुम्हाला बघतोच" म्हणत आणला चाकू
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, देवगाव रंगारी येथील शाळेत गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे वर्ग सुरू होते. सकाळी साडेअकराच्या सुमारास जेवणाची सुट्टी झाल्यानंतर सर्व विद्यार्थी हात धुण्यासाठी रांगेत उभे होते. या दरम्यान एका विद्यार्थ्याला अचानक धक्का लागल्याने दोन गटांमध्ये शाब्दिक वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संबंधित अल्पवयीन विद्यार्थी "थांबा, तुम्हाला बघतोच!" अशी थेट धमकी देऊन तिथून निघून गेला. काही वेळातच तो स्वतःसोबत पॉकेट चाकू घेऊन परतला आणि काही समजण्याच्या आत त्याने चार विद्यार्थ्यांवर सपासप वार करण्यास सुरुवात केली.
Chhatrapati Sambhajinagar Crime: चार विद्यार्थी जखमी
अल्पवयीन विद्यार्थ्याने केलेल्या या अचानक आणि प्राणघातक हल्ल्यामुळे वर्गात एकच पळापळ आणि गोंधळ उडाला. या हल्ल्यात दोन विद्यार्थ्यांच्या हाताला, एका विद्यार्थ्याच्या पायाला तर एका विद्यार्थ्याच्या पाठीवर चाकूचे वार झाले. घटनेनंतर गंभीर जखमी विद्यार्थ्याला प्रथम ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्यानंतर अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आलं. तर उर्वरित जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले.
Chhatrapati Sambhajinagar Crime: शाळेत भीतीचे वातावरण; हल्लेखोर विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात
या रक्तरंजित घटनेनंतर शाळा परिसरात तसेच पालकांमध्ये कमालीच्या भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी चाकूहल्ला करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. शाळेत पॉकेट चाकू कसा आला आणि यामागचे नेमके कारण काय? याबाबत पुढील तपास पोलीस करत आहेत.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा























