Chhatrapati Sambhaji Nagar Crime: माझ्यावर प्रेम कर, नाहीतर...; तरुणाच्या त्रासाला कंटाळून संभाजीनगरमध्ये 16 वर्षीय मुलीने आयुष्य संपवलं
Chhatrapati Sambhaji Nagar Suicide Case : छत्रपती संभाजीनगरमधून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. एका तरुणाच्या रोजच्या जाचाला कंटाळून 16 वर्षीय मुलीने विहिरीत उडी मारून आपलं जीवन संपवलं आहे.
छत्रपती संभाजीनगर : तरुणाच्या जाचाला कंटाळून एका 16 वर्षांच्या तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. जटवाडा रोडवर असलेल्या ओहर गावात ही तरुणी राहत होती. माझ्यावर प्रेम कर... अशी जबरदस्ती करत तिला कासिम यासीन पठाण नावाचा तरुण सतत त्रास देत होता. याच त्रासाला कंटाळून तरुणीने टोकाचं पाऊल उचललं आहे. या प्रकरणी तरुणाला तात्काळ अटक करावी, अशी मागणी तरुणीच्या कुटुंबियांनी केली, त्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आलं. रात्री उशिरा हरसुल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गावातील गॅरेजवर काम करायचा आरोपी
आरोपी कासिम यासीन पठाण हा ओहर गावातील एका गॅरेजवर काम करत होता. या तरुणाच्या जाचाला कंटाळून 16 वर्षीय मुलीने स्वत:च्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. हा धक्कादायक प्रकार रविवारी दुपारी 1 च्या सुमारास प्रकार घडला. पूजा शिवराज पवार असं मृत मुलीचं नाव आहे.
तरुणाचा जाच अन् मुलीचं टोकाचं पाऊल
पूजा ही अकरावी सायन्समध्ये शिकत होती. शहरात एका खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये तिने क्लास लावला असल्याने ती शहरातच राहत होती. रक्षाबंधनासाठी ती दोन दिवसांपूर्वी गावाकडे गेली होती. मागील आठ महिन्यांपासून आरोपी कासिम हा प्रेम कर... अशी बळजबरी करुन मुलीला त्रास देत होता. ही बाब तिने तिच्या कुटुंबियांना सांगितली होती. पूजाच्या कुटुंबीयांनी चार ते पाच वेळेस त्याला समजही दिली होती.
हिंगोलीत घडला अजब प्रकार
हिंगोलीत देखील एक धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रेम प्रकरणातून पोलिसांकडून त्रास झाल्याने तरुणानं झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केलीये. आत्महत्येचं कारण ठरणाऱ्या पीएसआय अधिकाऱ्यासह 9 जणांवर सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
हिंगोली जिल्ह्यातील पानकरेर गाव येथील आकाश देशमुख याचे जालन्यातील पिंपळगावच्या एका मुलीवर प्रेम होतं. तर प्रेमातून दोघांनी पळून जाण्याचाही निर्णय घेतला होता. परंतु यासाठी पोलीस अधिकाऱ्यासह नऊ जणांनी तरुणास त्रास दिला होता. याच त्रासाला कंटाळून तरुणाने पानकनेर गावच्या शिवारात झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पीसीआय संभाजी खाडे या अधिकाऱ्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
हेही वाचा: