संतापजनक! भटक्या श्वानास चाकूने भोसकले, तडफडत सोडला प्राण; घटना सीसीटीव्हीत कैद
Chhatrapati Sambhaji Nagar : या सर्व प्रकरणात अखेर 10 दिवसांनी शहरातील उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगर शहरातील (Chhatrapati Sambhaji Nagar City) उस्मानपुरा परिसरात रस्त्याच्या कडेला शांतपणे उभ्या श्वानाला एका माथेफिरूने चाकूने भोसकून ठार केल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. ही घटना 25 एप्रिल रोजी रात्री 1 वाजता घडली होती. दरम्यान या घटनेचा सीसीटीव्ही समोर आल्यावर सर्व प्रकरण समोर आले आहे. तर आरोपीस अटक करण्याची मागणी लाईफ केअर संस्थेचे अध्यक्ष धनराज शिंदे यांनी केली होती. दरम्यान, या सर्व प्रकरणात अखेर 10 दिवसांनी शहरातील उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपीचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर एक कॅफे असून, या कॅफेच्या परिसरात एक कुत्रा नेहमी बसलेला असायचा. परंतु, 25 एप्रिल रोजी रात्री 1 वाजता एका अज्ञात माथेफिरूने कुत्रा शांत बसलेला असताना खिशातून चाकू काढून रस्त्यात शांत उभ्या श्वानाच्या पोटात खुपसला. ज्यात कुत्रा जखमी झाला आणि त्याने जागेवरच जीव सोडला. दरम्यान, सकाळी रस्त्यावर हा कुत्रा रक्तबंबाळ अवस्थेत मृत पडलेला पाहून, कॅफेचे मालक काळे यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही तपासले असता सर्व प्रकार समोर आला.
त्यामुळे काळे यांनी याची माहिती ईफ केअर संस्थेचे अध्यक्ष धनराज शिंदे यांना दिली होती. तर शिंदे यांनी याप्रकरणी प्रथम वेदांतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होती. त्यानंतर उस्मानपुरा पोलिसांकडे गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यावर प्राण्यांचा छळ अधिनियम 11, 20 सह भादंवि 429 अन्वये गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याचा शोध सुरू केला आहे.
सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद
हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. ज्यात रस्त्यवर एक कुत्रा शांतपणे उभा होता. दरम्यान यावेळी तिथे एक युवक चालत येतो आणि कुत्र्याजवळ थांबतो. पुढे या युवकाने खिशातून चाकू काढून रस्त्यात शांत उभ्या श्वानाच्या पोटात खुपसल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. तर कुत्र्याला चाकू मारल्यावर हा युवक तेथून निघून जातो. मात्र जखमी श्वान बराच वेळ तडफडतो आणि जीव सोडताना पाहायला मिळाले. अंगावर शहारे आणणाऱ्या या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात असून, चाकू मारणाऱ्या माथेफिरूला अटक करण्याची मागणी होत आहे.
प्राणी जगणार कसे?
विशेष म्हणजे अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी अकोला येथे घडली होती. त्या व्यक्तीवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशा घटना वारंवार होत असल्यामुळे प्राणी जगणार कसे? असे पेट क्लिनिकचे डॉ. अमित परदेशी म्हणाले. अशा नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे, असे लाइफ केअर संस्थेचे सचिव जयेश शिंदे यांनी सांगितले. तर प्राण्यांवर अशा हल्ला करणाऱ्यांची पोलिसांना तत्काळ माहिती देण्याचे आवाहन देखील शिंदे यांनी केले आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :
Video : कांद्यावर जुगार खेळलो मला अटक करा, शेतकऱ्यांचा भावनिक व्हिडिओ व्हायरल