Chandrapur News : खंडणीसाठी युट्यूब पाहून जुळ्या भावांनी बनवला 'फुसका बॉम्ब'; गडचांदूरमधील 'त्या' घटनेबाबत मोठी अपडेट
Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर शहरातल्या भगवती एनएक्स या दुकानातून मिळालेली बॉम्बसदृश्य वस्तू ही बॉम्ब नसल्याचे निष्पन्न झाले आहे. जवळपास आठ तासांनंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
चंद्रपूर : जिल्ह्यातील गडचांदूर (Gadchandur) शहरातल्या भगवती एनएक्स या दुकानातून मिळालेली बॉम्बसदृश्य वस्तू बॉम्ब नसल्याचं अखेर निष्पन्न झाले आहे. जवळपास आठ तासांनंतर पोलीस (Police) आणि गडचांदूर शहरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. या प्रकरणात पोलिसांनी आयुष दाबेकर (Ayush Dabekar) आणि पियुष दाबेकर (Piyush Dabekar) या दोन जुळ्या भावांना अटक केली आहे. विशेष म्हणजे या दोघांचीही कुठलीच गुन्हेगारी पार्श्वभूमी नसून कर्जात बुडाल्यामुळे या दोघांनी खंडणी (Extortion) उकळण्यासाठी हे सर्व कृत्य केल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे.
आयुष दाबेकर आणि पियुष दाबेकर हे दोन्ही चिमूर (Chimur) इथले रहिवासी असून त्यांनी कोरपना तालुक्यातील पिंपळगाव येथे जलजीवन मिशनचे (Jal Jeevan Mission) काम घेतले होते. मात्र कामात तोटा आल्याने ते कर्जबाजारी झाले. हे कर्ज फेडण्यासाठी त्यांनी भगवती एनएक्स या दुकानाचे मालक शिरीष बोगावार यांच्या कडून खंडणी उकळण्याची योजना आखली.
युट्यूब पाहून जुळ्या भावांनी बनवला 'फुसका बॉम्ब'
त्यांनी युट्यूब पाहून लोखंडी पाईप, घड्याळ, बॅटरी आणि वायर एका पिशवीत ठेवून बॉम्ब सदृश्य वस्तू असल्याचा बनाव केला. ही पिशवी बोगावार यांच्या दुकानाच्या समोरच्या भागात ठेवून आरोपीने बाहेरूनच पलायन केले. त्यानंतर आरोपींनी दुकानात बॉम्ब असल्याची माहिती फोन करून दुकानदाराला दिली. दुकानात बॉम्ब ठेवल्याची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने पोलिसांनी कसून आरोपींचा शोध घेतला आणि काही तासातच आरोपींना अटक केली. दरम्यान, भगवती एनएक्स या दुकानातून मिळालेली बॉम्ब सदृश्य वस्तू गडचांदूर शहराच्या बाहेर हलवण्यात आली. बॉम्ब शोधक पथकाने गडचांदूर शहराबाहेर असलेल्या बी.एड. कॉलेज मैदानात या संशयित बॉम्बची तपासणी केली. गडचिरोली पोलिसांच्या विशेष पथकाच्या मदतीने हा बॉम्ब बनावटी असल्याचे निष्पन्न झाल्यावर स्फोट घडवून निष्क्रिय करण्यात आला.
इतर महत्वाच्या बातम्या