Buldhana Crime : आधी पतीचा खून, मग प्रियकराच्या वडिलांची हत्या; व्यसन आणि वासना शमवण्यासाठी महिलेने पातळी ओलांडली
Buldhana Crime : आधी व्यसन त्यातून पैशाची गरज आणि मग वासना पूर्ण करण्यासाठी एका महिलेने आधी आपल्याच नवऱ्याचा खून केला. यानंतर दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने पहिल्या प्रियकराच्या वडिलांचाही हत्या केली.
Buldhana News : व्यसन आणि वासना शमवण्यासाठी पुरुषच गुन्हे करतात असं नाही तर महिलाही यात मागे नसल्याचं बुलढाण्यात उघड झालं आहे. आधी व्यसन त्यातून पैशाची लालसा आणि मग वासना पूर्ण करण्यासाठी एका महिलेने आधी आपल्याच नवऱ्याचा खून केला. यानंतर दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने पहिल्या प्रियकराच्या वडिलांचाही हत्या केली. आता ही महिला आणि तिचा सध्याचा प्रियकर तुरुंगाची हवा खात आहेत.
लीला सारोकार असं या महिलेचं नाव आहे. लीला सारोकार ही सराईत गुन्हेगार आहे. व्यसनांमुळे लीला ही सराईत गुन्हेगार बनली. सुरुवातीला या महिलेला अनेक व्यसनं लागली. व्यसनासाठी पैसा आवश्यक असल्याने तिने वाम मार्ग पत्करला. त्यातून तिने दहा वर्षांपूर्वी आपल्या पतीची हत्या केली. या गुन्ह्याची शिक्षा भोगून ती तीन महिन्यांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आली होती. जेलबाहेर येत नाही तोच तिने एका तरुणासोबत प्रेमसंबंध प्रस्थापित केले. पण ही बाब या तरुणाच्या वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी तिला धमकावलं. आपल्या मुलापासून दूर राहायचं अशी धमकीच तरुणाच्या वडिलांनी लीला सारोकारला दिली होती.
यानंतर लीलाने त्या तरुणाला सोडलं. मग एक महिन्यापूर्वी दुसऱ्या तरुणाशी संधान बांधत आपल्या पहिल्या प्रियकराच्या वडिलांचा काटा काढण्याचं ठरवलं. त्यानुसार प्लॅन करुन 9 जुलै रोजी दोघांनी मिळून तरुणाच्या वडिलांची हत्या केली. दरम्यान बुलढाणा शहर पोलिसांनी 24 तासात या महिलेला तिच्या प्रियकरासह अटक केली. त्यानंतर दोघांना न्यायालयासमोर हजर केलं. न्यायालयाने त्यांना 14 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यामुळे मात्र व्यसन आणि वासनेसाठी महिलाही कुठलाही गुन्हा करु शकतात हे पुन्हा अधोरेखित झालं आहे.
पोलिसांनी काय सांगितलं?
बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांच्या माहितीनुसार, "10 जुलै रोजी आम्हाला संध्याकाळी सातच्या सुमारास सागवनचे सरपंचांचा आम्हाला फोन आला. सागवन शिवारामध्ये ख्रिश्चन ट्रस्टच्या बाजूला मोकळ्या जागेत एक इसम जखमी अवस्थेत पडला असल्याची माहिती दिली. यानंतर आम्ही तातडीने घटनास्थळी दाखल झालो तेव्हा तो इसम जिवंत असल्याचं दिसतं. यानंतर त्याला सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आलं. या इसमाची ओळख पटली नव्हती. रात्री उशिरा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या व्यक्तीची ओळख पटल्यानंतर खून करण्याच्या इराद्यानेच त्याला मारहाण झाल्याचं समोर आलं. अधिक तपास केल असता समजलं की, मृत व्यक्तीच्या मुलाचे आणि त्याच्या एका मित्राचे त्याच परिसरातील लीला सारोकार या महिलेसोबत अनैतिक संबंध होते. आपल्या मुलापासून दूर राहण्यासाठी या व्यक्तीने लीला सारोकारला बजावलं होतं. तसंच यावरुन त्याचं आणि लीलाचं भांडण देखील झालं होतं. त्यानंतर महिलेने तिच्या दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने संबंधित व्यक्तीला मारण्याचं ठरवलं. 9 जुलै रोजी तिच्या दुसऱ्या प्रियकर या व्यक्तीला दारु पाजली आणि एका निर्जन ठिकाणी आणून दगडाने ठेचून मारहाण केली. यात तो जबर जखमी झाल्यानंतर त्याला तिथेच सोडून दोघेही पसार झाले. त्यानंतर पोलिसांनी तपास करत दोघांना अटक केली."