बायकोची वेगळा संसार थाटण्याची मागणी, अन् नवऱ्यानं थेट गळाच आवळला; पोलिसांकडून अटक
Bhiwandi Crime: सासऱ्यांसोबत न राहता पतीपत्नीचा वेगळा संसार थाटण्याची मागणी करणाऱ्या पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीनं पत्नीची निर्घृण हत्या केली.
Bhiwandi Crime News : भिवंडीमध्ये (Bhiwandi Crime) घडलेल्या धक्कादायक घटनेनं संपूर्ण शहर हादरलं आहे. सासऱ्यांसोबत न राहता वेगळं राहण्याची मागणी करणाऱ्या पत्नीची पतीनं निर्घृण हत्या केली आहे. हत्या करणाऱ्या पतीला भिवंडी पोलिसांनी (Bhiwandi Police) अटक केली आहे. सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मुंबई नाशिक महामार्गालगत (Mumbai-Nashik Expressway) एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी केली असता धक्कादायक घटनेचा उलगडा झाला.
सासऱ्यांसोबत न राहता पतीपत्नीचा वेगळा संसार थाटण्याची मागणी करणाऱ्या पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीनं पत्नीची निर्घृण हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावाच्या हद्दीत सोमवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास मुंबई नाशिक महामार्गालगत एका अज्ञात महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर महिलेचा मृतदेह महामार्गालगत टाकून दिला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला आणि तात्काळ चौकशी सुरू केली होती.
घटनेसंदर्भात माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदासाठी रुग्णालयात दाखल केला. त्यामध्ये रात्री उशिरा पोलिसांना मृत महिलेचं नाव समजलं. रमशा अब्दुल रहमान अन्सारी (वय 24 रा. अजमेर चौक, शांतीनगर) असं मृत महिलेचं नाव होतं. पोलीस तपासातून ही माहिती समोर आल्यावर मयताचे नातेवाईक यांच्याकडे चौकशी करण्यास सुरवात केली. पोलिसांनी मृत महिलेच्या नातेवाईकांसोबतच शेजारी-पाजाऱ्यांचीही चौकशी केली. चौकशीत सातत्यानं संशयाची सुई मृत महिलेच्या पत्नीकडेच जात होती.
संशयाची सुई पतीकडे वळल्यानंतर अखेर पोलीस पथकानं रात्री पाऊणे दोन वाजताच्या सुमारास पती अब्दुल रहमान बिलाल अन्सारी (वय 26 रा. बिलाल नगर शांतीनगर) याला ताब्यात घेत चौकशी केली. पत्नी वडीलांपासून वेगळं राहण्यासाठी तगादा लावत होती. परंतु, वडील आजारी असल्यानं त्यांना सोडून राहणं जमणार नसल्यानं त्यावरून वाद विकोपाला जाऊन पत्नीची हत्या केल्याचं अब्दुलनं कबूल केलं. आरोपी पती विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत अब्दुल रहमान बिलाल अन्सारी याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच, पोलिसांकडून घटनेची अधिक चौकशी सुरू आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :